प्रतिनिधी/ बेळगाव
दारिद्रय़ रेषेखालील जनतेला जीवनाश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडून रेशनचा पुरवठा केला जातो. मात्र, बऱयाच लाभार्थींकडे रेशनकार्ड नसल्याने रेशनपासून वंचित रहावे लागत आहे. तर काही लाभार्थींनी नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. अशा अर्जांपैकी राज्यात 3.5 लाख रेशनकार्डे पात्र ठरली आहेत. यापैकी 31 हजार रेशनकार्डे बेळगाव जिल्हय़ातील आहेत. त्यामुळे अर्ज केलेल्यांना लवकरच नवीन रेशनकार्ड मिळणार आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे गोरगरीब जनता अडचणीत आली होती. शासनाकडून त्यांना अतिरिक्त धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, रेशनकार्डअभावी अनेक लाभार्थी रेशनपासून वंचित आहेत. लाभार्थींनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. लॉकडाऊन काळात पडताळणी प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याने नवीन रेशनकार्डचे काम ठप्प झाले होते. मात्र, आता अनलॉकनंतर अर्जदारांची पडताळणी सुरू झाली आहे. त्यानुसार बेळगाव जिल्हय़ातील 31 हजार रेशनकार्डे पात्र ठरली आहेत.









