भरवस्तीत शिवाजीनगर रस्त्यावर आढळला वावर, वन्यजीव अभ्यासकांच्या दृष्टीने आनंददायी क्षण
प्रतिनिधी/ चिपळूण
अतिशय बुजरा व भित्रट स्वभाव, परिसराशी मिळत्या-जुळत्या रंगामुळे चटकन लक्षात न येणारे व अतिशय दुर्मीळ मानले जाणारे पिसोरी हरणाचा चिपळूणात वावर दिसून आला आहे. दोनच दिवसांपूर्वी चिपळुणात भरवस्तीत हे हरीण दिसले आहे. शहरातील कर्करोग तज्ञ डॉ. विक्रम घाणेकर यांना मॉर्निग वॉकच्यावेळी या हरणाचे दर्शन झाले.
जिल्हय़ात वनविभागाच्या आतापर्यंतच्या वेगवेगळय़ा प्राणी गणनेत कधीही ‘रेकॉर्डव’र न आलेल्या या हरणाचे हे दर्शन वन्यजीव अभ्यासकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड असलेल्या डॉ घाणेकर यानी अनेक देशांमध्ये फोटोग्राफी केली आहे. देशातील अनेक जंगलातही त्यांनी भटकंती केली आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटे 5.30 च्या सुमारास कचरा प्रकल्पाकडे जाणाऱया भरवस्तीतील रस्त्यावर हे पिसोरी हरीण त्यांना दिसल्यावर त्यांनी त्याचे फोटो तसेच व्हीडीओही काढला.
यापुर्वी चांदोलीत दर्शनः डॉ. घाणेकर
यासंदर्भात ‘तरूण भारत’शी बोलताना डॉ. घाणेकर यांनी सांगितले की, गेली दहा वर्षे आपण या रस्त्यावर मॉर्निंग वॉकला जातो. अनेकवेळा भेकरं, डुकरासह वेगवेगळे प्राणी दिसतात. मात्र या दिवशी प्रथमच पिसोरी हरण दिसले. या भागाच्या वरच्या बाजूला असणाऱया झाडीमध्ये त्याचा वावर असावा. रात्रीच्यावेळी ते मानवी वस्तीच्या जवळ येतात. साधारण मांजरापेक्षा थोडा मोठा आकार त्याचा असतो. त्यामुळे सहजपणे ते ओळखू येत नाही. मला ते ‘लकी’ली दिसले. यापूर्वी मला चांदोलीमध्ये असा प्रकारचे हरीण दिसले होते.
भित्रा व लाजाळू प्राणी
वन्यजीव अभ्यासक ओंकार बापट यांनी सांगितले की, मुळातच हा प्राणी अतिशय भित्रा आणि लाजाळू आहे. आपल्याकडे त्याचा वावर असला तरी भरवस्तीलगत त्याचे अस्तित्व प्रथमच दिसून आले आहे. तपकिरी रंग, अंगावर पांढरे पट्टे व पिवळे ठिपके असणाऱया या प्राण्याच्या पोटाकडील भाग पांढरा, तर शरीरावर पांढरे पट्टे असणाऱया या प्राण्याची शरीरयष्टी सडपातळ असते. शरीराचा मागील भाग उंच असतो. पाय अतिशय नाजुक असतात. दाट जंगलातील भागात व मोठे वृक्ष असलेल्या भागात साधारणत: याचे वास्तव्य आढळते. परिसराशी मिळत्या-जुळत्या रंगामुळे याचे पटकन दर्शन होत नाही. अतिशय दुर्मीळ असा हा प्राणी आहे. आपल्याकडे त्याचे शहराजवळ अस्तित्व सापडले, हे सुखावह असल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत नोंद नाही
कोयना व चांदोली ही दोन्ही अभयारण्ये जिल्हय़ाला लागून असल्याने साहजिकच बिबटय़ासह वन्यप्राण्यांचा वावर सहय़ाद्रीच्या खोऱयात अधिक दिसतो. जिल्हय़ाच्या पूर्व सीमेवर सहय़ाद्री पर्वताच्या उंच रांगांमध्ये विपूल वनसंपदा आहे. अभयारण्यांमुळे वन्यजीवांचा वावर जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात आहे. वनविभागाकडून नेहमी व्याघ्र तसेच पाणवठय़ावरील वन्यप्राणी गणना केली जाते. यामध्ये वेगवेगळय़ा प्रकारच्या प्राण्यांची नोंद झालेली असली तरी त्यात आतापर्यंत पिसोरी हरणाचे अस्तित्व मात्र कुठेही आढळून आलेले नाही. जंगलमय भागात त्याचा वावर असला तरी सहजपणे तो कधी गणनेत अथवा कुणाच्या दृष्टीस पडलेला नसल्याचे वनविभागाचे परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख यांनी सांगितले.









