गर्दी होण्याची शक्यता, गणेशोत्सवासाठीच्या विशेष रेल्वेच्या आशा मावळल्या
प्रतिनिधी/ चिपळूण
कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांना दहा दिवसांच्या विलगिकरण कालावधी बुधवारी संपत आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांत महामार्गावर चाकरमान्यांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. या काळात वाहतूककोंडी होऊ नये म्हणून 29 ऑगस्टपर्यत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सवात विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्याबाबत कोणत्याच हालचाली दिसत नसल्याने रेल्वे प्रवासाच्या आशा मावळत चालल्या आहेत.
कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी कोकणातील गणेशभक्तांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कोकणात येणाऱया चाकरमान्यांबाबत शासनाच्या ‘तळय़ात मळय़ात’ भूमिकेमुळे निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण अजूनही कायम आहे. सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने आणि वेळेत नियमावली जारी न केल्याने ग्रामपंचायतीनी 14 दिवसांचे विलगीकरण बंधनकारक केले. या मुदतीतच चाकरमान्यांना गावात प्रवेश देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याने चाकरमान्यांनी मिळेल ते वाहन पकडत गावचा रस्ता धरला. त्यानंतर सरकारने जागे होत क्वारंटाईनसाठी दहा दिवसांचा कालावधी निश्चित केला. अगदी अंतीम क्षणी एस.टी. बसेस सोडण्यास सुरूवात केली. मात्र दोन महिने अगोदरच खासगी बससाठी हजारो रूपये गुंतवून आरक्षण झालेले असल्याने एस.टी. सेवेला चेमतेमच प्रतिसाद मिळाला. दरवर्षी जिल्हय़ात प्रत्येकर 70-80 प्रवाशांसह दीड ते दोन हजार बसेस धावत असताना यावर्षी 22 जणांना घेऊन पाचशे बसेसही धावल्या नाहीत.
22 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सुरु होत असल्याने दहा दिवसांच्या विलगीकरणाची मुदत बुधवारी संपुष्टात येत आहे. त्यानंतर 21 ऑगस्टपर्यंत येणाऱया चाकरमान्यांसाठी प्रवासापूर्वी कोविडची चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. चाचणी निगेटिव्ह असेल तरच प्रवास करता येणार आहे. यासाठीची धावपळ व भूर्दड लक्षात घेऊन पुढच्या चोवीस तासांत महामार्गावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जड वाहने व रेती वाहतुकीमुळे वाहतूककोंडी होऊ नये म्हणून महामार्गावर रत्नागिरी, सिधुदुर्ग व रायगड जिह्यात येणाऱया अवजड वाहनांना (16 टनापेक्षा अधिक असलेले वाहन) वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये ट्रक, मल्टाऍक्सल व ट्रेलर यांच्यावर 10 ते 29 ऑगस्टपर्यत पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
विशेष रेल्वेच्या आशा मावळत चालल्या!
गणेशोत्सवासाठी एस.टी. च्या जोडीला विशेष रेल्वे कोकणात सोडण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र संपत चाललेला विलगीकरण कालावधी, बंधनकारक केलेली ऍन्टीजेट टेस्ट आणि रेल्वे सोडण्याबाबत कोणत्याच हालचालींचा अभाव पाहून गणेशोत्सवात रेल्वेतून प्रवासाच्या आशाही आता मावळत चालल्या आहेत.









