40 किमीपेक्षा अधिक नसावा वेग- सरकारचा नवा प्रस्ताव
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
4 वर्षांपर्यंतच्या मुलांना दुचाकीवर बसून नेताना त्याचा वेग 40 किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक असू नये. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने बालप्रवाशांसाठी सुरक्षा उपाय लागू करण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव मांडला आहे. मंत्रालयाने एका मसुदा अधिसूचनेत (ड्राफ्ट नोटिफिकेशन) दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱया 9 महिन्यांपासून 4 वर्षांपर्यंतच्या मुलाला क्रॅश हेल्मेट घातलेले नसावे, याची जबाबदारी चालकाची असावी असाही प्रस्ताव देण्यात आला आहे.
4 वर्षांपर्यंतच्या मुलाला नेताना मोटरसायकलचा वेग 40 किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक असू नये. 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना स्वतःसोबत बांधून ठेवण्यासाठी ‘सेफ्टी हार्नेस’चा वापर करण्याची जबाबदारी चालकाची असावी, असे मंत्रालयाकडून म्हटले गेले आहे.
सुरक्षा हार्नेस मुलांकडून परिधान केले जाणारे एक असे जॅकेट असते, ज्याच्या आकारात फेरबदल केला जाऊ शकतो. त्या सुरक्षा जॅकेटशी जोडलेले बेल्ट वाहनचालक स्वतःच्या खांद्यांशी जोडू शकतो अशाप्रकारे लावलेले असावेत. मंत्रालयाने मसुदा नियमांवर आक्षेप आणि सूचना मागविल्या आहेत.









