दीपावलीच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज, बाजारपेठेत खरेदीला उधाण
प्रतिनिधी /बेळगाव
लखलख चंदेरी तेजाने मनामनाला व भवतालाला उजळवणाऱया दिवाळीच्या उत्साह पर्वाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. घराघरात आणि शहर परिसरात दिवाळीच्या स्वागतासाठी प्रत्येक जण सज्ज झाला आहे. अर्थातच बाजारपेठेत खरेदीला उधाण आले आहे. आकाश कंदील, पणत्या, रांगोळी, पूजा साहित्य, विद्युत रोषणाईचे साहित्य आदींच्या खरेदीला वेग आला आहे.
दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक दारामध्ये आकाश कंदील लावण्याचा पूर्वापार प्रघात आजही जपला गेला आहे. दिवाळी साजरी करणारे प्रत्येक कुटुंब आकाश कंदील लावते. त्यामुळे सर्वत्र आकाश कंदील टांगलेले दिसत आहेत. आकाश कंदिलांमध्ये यंदा काही अंशी दरवाढ झाली आहे. परंतु यंदा चिनी बनावटीच्या आकाश कंदिलांपेक्षा भारतीय आकाश कंदिलांना मागणी आहे. अनार, पिरॅमीड आकाश कंदील हे यंदाचे वैशिष्टय़ आहे. साधारण 100 ते 550 रुपयांपर्यंत आकाश कंदिल उपलब्ध आहेत. अलिकडे घरांप्रमाणे कार्यालयांमध्येही दिवाळीच्या निमित्ताने सजावट करण्यात येते. कार्यालयातील प्रत्येक विभागात लावण्यासाठी लहान आकारांचे आकाश कंदील उपलब्ध आहेत.
लक्षवेधी, आकर्षक पणत्या उपलब्ध
पणत्यांची दुनिया आता बदलली आहे. साध्या मातीच्या पणत्यांपासून सजावटीच्या पणत्यांपर्यंतचा प्रवास अनोखा आहे. बेळगावमध्ये प्रामुख्याने खानापूरमधून पणत्या आणल्या जातात. पूर्वी मातीच्या पणत्या घरोघरी लावल्या जात असतं.
परंतु आज पणत्यांना सजावट करण्याचा नवीन उद्योग उदयास आला आहे. पणत्यांवर ऑईलपेंटने रंगवून त्यावर नक्षीकाम केले जाते. या शिवाय जरदोजी सजावटही केली जाते. म्हणजेच मणी, मोती लावून पणत्या अधिक आकर्षक केल्या जातात. या शिवाय पणत्यांमध्ये कमळ, दीपमाळ तसेच छोटय़ा पणत्यांच्या साहाय्याने बनविलेले मनोरे सध्या विक्रीस आले आहेत.
रांगोळय़ांनी बाजारपेठ सजली
रांगोळय़ा काढण्याची पेझ वाढत चालली आहे. दिवाळीच्या दिवशी तसेच पूर्ण आठवडा आणि प्रमाख्याने लक्ष्मी पूजनादिवशी इतर दिवसांच्या तुलनेत मोठी रांगोळी रेखाटली जाते. त्यामुळे रांगोळय़ांनी बाजारपेठ सजली आहे. दहा रुपयाला रांगोळीचे पाकिट मिळते तर दहा रुपयाला तीन माप रंग उपलब्ध आहेत. लक्ष्मी पूजनादिवशी रांगोळी कलाकारांना बोलून रांगोळी रेखाटून घेण्याचा प्रकार अलिकडे वाढीस लागला आहे. त्यामुळे उत्तमोत्तम रांगोळय़ा पहायला मिळतात.
कपडय़ाची, प्लास्टिकची तोरणे उपलब्ध
प्रवेशद्वारावर लावण्यासाठी मण्यामोत्यांची, खणाच्या कपडय़ाची, प्लास्टिकची तोरणे उपलब्ध आहेत. महिलावर्ग स्वतः तोरण तयार करुन विक्रीस ठेवत आहे. विविध प्रदर्शनांमध्ये तोरणांचा एक खास स्टॉल अलिकडे दिसू लागला आहे. या शिवाय प्लास्टिकच्या फुलांची तोरणे बाजारपेठेत आली आहेत. या तोरणांच्यामध्ये वेलकम, शुभलाभ अशी अक्षरेही तयार करुन मिळत आहेत.
तयार फराळाला विशेष मागणी
तयार फराळाला विशेष मागणी वाढली आहे. मुख्य म्हणजे परदेशात असणाऱया मुलांना दिवाळीत फराळ मिळावा यासाठी कुरिअर सेवा उपलब्ध झाल्याने बरीच कुटुंबे दिवाळीपूर्वीच फराळ खरेदी करतात. यामुळे तयार फराळ करणाऱयांनी साधारण 15 दिवसांपूर्वीच फराळ बाजारपेठेत आणला आहे. चकली, चिवडा, करंजी, लाडू, शंकरपाळी, अनारसे यांची पाकिटे किलोप्रमाणे मिळत आहेत. चिवडय़ामध्ये असंख्य प्रकार असून ग्राहक त्याच्या आवडीच्या चविचा चिवडा खरेदी करत आहेत.
दिवाळीला भेटवस्तू देण्याचा प्रघात आहे. प्रामुख्याने ड्रायप्रुटस्ची भेट दिली जाते. लहान बॉक्सपासून हजार, बाराशे रुपयांपर्यंत ड्रायप्रुटस् उपलब्ध आहेत. या शिवाय मिठाई, चॉकलेट, मिल्कमेड, गुलाबजामुन, रसमलाईंचे छोटेछोटे कॅनसुद्धा मिळत आहेत. त्यामुळे नोकरदार महिलांचे कष्ट वाचले आहेत.
फळ आणि फुलांची बाजारपेठ अधिकच बहरली आहे. आज वसुबारस. आजपासून पूर्ण आठवडा धन्वंतरी पूजा, लक्ष्मी पूजन असल्याने फुलांची आवक वाढती राहणार आहे. शनिवारी, रविवारीसुद्धा फुले आणि फळांची मोठी खरेदी झाली. त्याचबरोबर पूजा साहित्यही सर्वत्र मिळत आहे. लक्ष्मी पूजेसाठी खारीक, बदाम, खोबरे, सुपारी, हळकुंड यांचे पाकिट, हळदी-कुंकवाची पाकिटे किंवा डब्या, धूप, वाती, गेजवस्त्र, कापसाचे हार, विपेत्यांनी आणले आहेत. रविवारी या साहित्याचीसुद्धा खरेदी झाली. केळींचे मोने, विडय़ाची पाने, श्रीफळ यांनाही मागणी वाढली आहे. या शिवाय पाट, चौरंग घेऊन कंबळीखुट येथे विपेते बसले आहेत.
दिवाळी म्हणजे विद्युत रोषणाई आलीच. विद्युत माळा तसेच चांदणी, विविध प्रकारच्या लॅम्पशेडस् यांची दुकाने सजली आहेत. प्रामुख्याने पांगुळ गल्ली व बापट गल्ली येथे हे साहित्य अधिक प्रमाणात मिळते.









