
साताऱयातील प्राजीत परदेशी यांचा उपक्रम
मालवण:
सातारा जिल्हय़ातील लोणंदचे सुपुत्र, एव्हरेस्टवीर प्राजीत परदेशी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दांडी येथे समुद्रात किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने सुमारे 400 फूट लांब निसर्गपूरक खाद्याचे रंग व मत्स्य खाद्य यांचा वापर करून भारताचा तिरंगा बनवून अनोखी सलामी दिली. कोणत्याही देशाचा 400 फूट लांब ध्वज अशा पद्धतीने समुद्रात तयार करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. यावेळी ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’च्या जयघोषाने मालवणचा समुद्र किनारा दुमदुमून गेला होता.
प्राजीत परदेशी यांची ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी साहसी छायाचित्रकार मेहुल ढवळे, वनरक्षक विश्वास मिसाळ, राहुल परदेशी, मालवण येथील अन्वय अंडरवॉटर सर्व्हिसेसचे रुपेश प्रभू, अन्वय प्रभू, सुमन लोणे, रश्मीन रोगे, नारायण रोगे, महादेव केळुसकर, सन्मेश परब यांचे सहकार्य लाभले.
यापूर्वी प्राजीत परदेशी व त्यांच्या सहकाऱयांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी 321 फुटाची भव्य तिरंगा रॅली लोणंदमध्ये काढली होती. मागील वर्षी सिंहगडावर 350 फूट भगवी रॅली काढून तानाजी मालसुरे यांना आदरांजली वाहिली होती. तर तीन महिन्यांपूर्वी कळसूबाई शिखरावर तिरंगा ध्वजाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा साकारला होता. तर गेल्या डिसेंबर महिन्यात मालवण दांडी येथे समुद्रात 321 फुटी तिरंगा फडकविला होता.









