नवे शिक्षणमंत्री बी. सी. नागेश दुपारी 3 वाजता जाहीर करणार निकाल
प्रतिनिधी/ बेंगळूर
जुलै महिन्यात 19 आणि 22 रोजी पार पडलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवार दि. 9 ऑगस्ट रोजी जाहीर केला जाणार आहे. दुपारी 3 वाजता निकाल शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर उपलब्ध केला जाणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या संचालक व्ही. सुमंगला यांनी दिली आहे.
दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. मात्र, नूतन मंत्र्यांना खातेवाटप झाले नसल्याने निकाल जाहीर करण्यात आला नाही. आता मंत्री बी. सी. नागेश नवे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री झाले असून ते सोमवारी दुपारी 3 वाजता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहेत.
दहावी उत्तर पत्रिकेचे मूल्यमापन पूर्ण झाले असून शिक्षण खात्यासाठी नव्या मंत्र्यांची नेमणूकही झाली आहे. निकाल जाहीर करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच हा निकाल शिक्षण खात्याच्या मुख्य सचिव उमाशंकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे निकालाविषयी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
19 आणि 22 जून रोजी राज्यात अत्यंत यशस्वीपणे दहावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. दोन दिवस झालेल्या परीक्षेला 99.65 टक्के विद्यार्थी हजर झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली होती. सुमारे 8.49 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एका वर्गखोलीत केवळ 12 विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती.








