प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीतील प्रसिध्द ब्रिटीशकालीन थिबा राजवाडय़ाची माहिती घेण्याबरोबर पर्यटकांना येथे आणखीन मोहित करण्यासाठी अन्य कला-वस्तूंच्या दालनांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी येथील पुरातत्व विभागाकडून 3 कोटी 22 लाखांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. हा निधी मंजूर होताच येथील कला दालनांच्या कामाला प्रारंभ होणार आहे.
थिबा राजवाडा पाहण्यासाठी देशासह परदेशातील अनेक पर्यटक, अभ्यासक मोठय़ा संख्येने येत असतात. मागील काळात हा राजवाडा दुरूस्तीच्या कारणातून पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवण्यात आला होता. राजवाडय़ाच्या दुरूस्तीची कामे अंतिम टप्प्यात गेल्यानंतर राजवाडय़ाचे अंतरंग पुरातत्व विभागाने पर्यटकांसाठी खुले केले. पण अंतर्गत काही कामांची दुरूस्तीची कामे व परिसराचा विकास अजूनही प्रलंबित राहिला आहे. थिबा राजवाडय़ाच्या दुरूस्तीवर कोटय़वधीचा निधी खर्च केला जात आहे. पर्यटन निधीतूनही या स्थळाचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. पण मागील काळात त्याला मूर्त स्वरूप येत नव्हते. या वास्तू व परिसराच्या देखभाल व दुरूस्तीसाठी कोटय़वधींचा निधी खर्च होत आहे.
राज्य संरक्षित स्मारक जतन-दुरूस्ती योजनेतून राजवाडय़ाच्या छताच्या कामासाठी 1 कोटीचा निधी मंजूर होऊन छताचीही दुरूस्ती यापूर्वीच करण्यात आली. राजवाडय़ातील लाकडी सामान त्यात खिडक्या, दरवाजे, बडोद बदलणे, लाद्या आदी कामांसाठी 1 कोटी 35 लाखाचा निधी मागील काळात मंजूर झाला होता. त्यातून मोडकळीस आलेले लाकडी सामान बदलणे व दुरूस्ती आदी कामे करण्यात आली. राजवाडय़ाचे छप्पर, गॅलरी, खिडक्या, जिने व अन्य कामे करण्यात आली. राजवाडा बांधण्यात आला, त्यावेळी ज्या पद्धतीने काम झाले, त्या पद्धतीने पुरातत्व विभागाच्या सूचनांनुसार सागवानी लाकडात संपूर्ण लाकडी काम करण्याची कार्यवाही झाली. अजूनही राजवाडय़ातील काही खोल्यांच्या दुरूस्तीची कामे शिल्लक आहेत.
गतवर्षी राजवाडा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला. राजवाडय़ात एकूण 14 खोल्या व 2 मोठी दालन आहेत. मात्र येथील दालनांचा विकास करण्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.जेणेकरून राजवाडय़ाची माहिती घेण्यासह येथे भेट देणाऱया पर्यटकांना तेथे रममाण होता यावे, यासाठी राजवाडय़ात 8 विविध संग्रहित कला व वस्तूंची दालने उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये ऐतिहासिक वस्तू, शस्त्र दालन, मूर्ती दालन, नौका दालन, पुरातन वस्तू दालन, चित्र दालन अशा विविध दालनांचा समावेश आहे. या राजवाडय़ात येणाऱया पर्यटकांना त्या विषयी खास आकर्षण ठरण्यास मदत होणार आहे. या दालनांच्या निर्मितीचा 3 कोटी 22 लाखांचा प्रस्ताव येथील पुरातत्व विभागामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच येथील दालन निर्मिती कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले.
नौका दालनासाठी 6 वर्षांपूर्वीच नौकांची मॉडेल उपलब्ध
येथे सुमारे 6 वर्षापूर्वी 21 जहाजे थिबा राजवाडय़ात आली आहेत. विविध प्रकारची 21 जहाजे ठेवण्यात येणार आहेत. परंतु दालनासाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. कोल्हापूरमधून 21 जहाज व होडय़ा प्राप्त आहेत. यामध्ये मचवा, पगार, होडी, पडाव, बतला, कोथया, अरब डो, अरब बार्ज, गलबत, डांगी, पोर्तुगिज बोट, बग्गाला, पोर्तुगिज, बाँब केज, गुराबा, ब्रिटीश गॅली, इंग्लिश स्मॉल गॅलन, ब्रिटीश गली, पाल, पोर्तुगिज गॅलॅलो आदी प्रकारांच्या जहाजांचा समावेश आहे.









