वृत्तसंस्था/ व्हॅनेटा
फिनलँडमध्ये सुरू झालेल्या सुदीरमन चषक मिश्र सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अ गटातील पहिल्याच लढतीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. थायलंडने या लढतीत भारताचा 4-1 असा दणदणीत पराभव केला.
सदर स्पर्धेच्या अ गटातील पहिल्या लढतीमध्ये पी.व्ही. सिंधु त्याचप्रमाणे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना खेळविले गेले नाही. मात्र के. श्रीकांत, अश्विनी पोनापा तसेच एन. सिक्की रेड्डी या अनुभवी खेळाडूंना हार पत्करावी लागली. महिला एकेरीच्या सामन्यात भारताच्या मालविका बनसूदला थायलंडच्या बॅडमिंटनपटूंकडून हार पत्करावी लागली.
या लढतीत पुरूष एकेरीच्या पहिल्या सामन्यात थायलंडच्या विटीडसेमने भारताच्या के श्रीकांतचा 50 मिनिटांच्या कालावधीत 21-9, 21-19 असा पराभव केला. महिला दुहेरीच्या सामन्यात थायलंडच्या पी रवींदा आणि जे.किटीहेराकुलने भारताच्या अश्विनी पोनाप्पा व एन सिक्की रेड्डीचा 23-21, 21-8 असा पराभव करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. महिला एकेरीच्या सामन्यात थायलंडच्या पी.चोचुवाँगने मालवीकाचा 21-11, 21-14 असा पराभव केला. पुरूष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या अर्जुन आणि कपिला या नवोदित जोडीने थायलंडचा जोमको आणि केड्रेनचा 21-18, 21-17 असा पराभव केला. त्यानंतर या लढतीतील शेवटच्या दुहेरी सामन्यात थायलंडच्या डिचेपॉल आणि सेपसिरी यांनी साई प्रणित व तनिशा क्रस्टोचा 21-13, 21-11 अशा गेम्स्मध्ये पराभव केला. आता या स्पर्धेत सोमवारी भारताची अ गटातील पुढील लढत विद्यमान विजेत्या चीन बरोबर होणार आहे.









