नाईट कर्फ्यूमुळे उत्साहावर विरजण
प्रतिनिधी / बेळगाव
नववर्षाच्या जल्लोषी स्वागतासाठी नागरिकांसह तरुणाई सज्ज झाली आहे. विशेष करून यादिवशी युवकांकडून पाटर्य़ांचे आयोजन केले जाते. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पाटर्य़ा रंगणार आहेत. काही युवकांनी ओल्डमॅनच्या प्रतिकृती केल्या असून दरवषीप्रमाणे थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.
तरुणाई थर्टीफर्स्टसाठी सज्ज झाली असली तरी प्रशासनाने मात्र मंगळवारपासून नाईट कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे रात्री उशिराने पाटर्य़ांचे आयोजन करणाऱया युवकांसमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा शहरापेक्षा ग्रामीण भागातच थर्टीफर्स्टच्या पाटर्य़ा रंगतील, असे युवकांतून बोलले जात आहे.
दरवषे युवक मोठय़ा प्रमाणात थर्टीफर्स्टला पाटर्य़ांचे आयोजन करतात. मात्र सध्या नाईट कर्फ्यू लागू केल्याने पाटर्य़ांसाठी युवकांना जागांची शोधाशोध करावी लागणार आहे. त्यामुळे पोलिसांची नजर नसलेल्या ठिकाणी युवकांना जागा शोधावी लागणार आहे. शहरात मंगळवारपासून नाईट कर्फ्यू लागू केल्याने ओल्या पाटर्य़ा करणाऱया युवकांसमोर पाटर्य़ा कोठे कराव्यात? हा प्रश्न पडला आहे. विशेषतः ग्रामीण भागात नाईट कर्फ्यूबाबत कडक नियम नसल्याने 31 डिसेंबरच्या पाटर्य़ांचा धुरळा उडणार आहे. ओल्डमॅनचे दहन करून नववर्षाचे स्वागत करण्यात येते. त्यामुळे बालचमूंनीही ओल्डमॅन तयार केले आहेत.
प्रशासनाने रात्री दहानंतर जमावबंदी जाहीर केल्याने हॉटेल चालकांना फटका बसणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेलमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा नाईट कर्फ्यूमुळे उत्साहावर विरजण पडणार आहे.









