आजकाल मोबाईल वापरत नाही असा माणूस शोधावाच लागेल. चॅटिंगपासून गेमिंगपर्यंत व पैशाच्या व्यवहारापासून बजेटिंगपर्यंत सगळय़ा गोष्टी मोबाईलमुळे अगदी सहज शक्मय झाल्या आहेत. पण तुम्ही मोबाईल सुरक्षेबाबत काळजी घेता का? आपले अकाउंट हॅक झाले तर काय होईल अशी शंकाही अनेकांच्या मनात येत असेल, पण त्याचा गांभीर्याने विचार न करता आपले वैयक्तिक आयुष्य आपण सर्वांसमोर उघड करत असतो.
नोटबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना चालना मिळाली. विविध पैशाची वॅलेट म्हणजे गुगल पे, भीम, फोन पे, पेटीएम यासारखी पेमेंट ऍप्स, याचबरोबर बँकांनी सुरु केलेली त्यांची स्वतंत्र ऍप्स यामुळे मोबाईल बँकिंगचा वापर सुरू झाला आणि पुढे तो लोकप्रियही झाला. आजकाल अगदी फेरी विपेतेही गुगल पे, पेटीएम यासारख्या व्यवहार ऍपने करतात. रोख रक्कम जवळ बाळगताना चोरांची भीती असते, तशीच भीती ऑनलाईन व्यवहारांमध्येही असते. वाढत चाललेल्या सायबर गुह्यांमुळे आपल्या बँक अकाऊंटचा बॅलन्स कधीही शून्यावर येऊ शकतो, ही चिंता अनेकांना सतावत असते. पण त्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाते का? आपल्या मोबाईलवर आपण अनेक महत्त्वाचा व खाजगी डेटा स्टोअर करून ठेवलेला असतो. यामध्ये काही आपले वैयक्तिक फोटो व व्हीडिओही असतात. कोणी आपली वैयक्तिक खाजगी माहिती हॅक तर करणार नाही ना, त्याचा गैरवापर तर करणार नाही ना असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात भीती निर्माण करत असतात. ही भीती अनाठायी आहे का? तर, नक्कीच नाही. तुमची भीती योग्य आहे. पण म्हणून घाबरून मोबाईलवरून आर्थिक व्यवहार न करणे किंवा मोबाईलचाच वापर न करणे हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही. मग करायचे तरी काय हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल.
मोबाईल सुरक्षा
1. सायबर सिक्मयुरिटी ऍप्स आणि हॅकर्स ः सायबर सिक्मयुरिटी ऍप्स आणि हॅकर्स यांची लढाई टॉम अँड जेरीसारखी सतत चालू असते. हॅकर्सविरुद्ध जिंकणे, हँकिंगला आळा घालणे ही काही एका रात्रीत करता येण्यासारखी गोष्ट नाही. जितकी नवीन सिक्मयुरिटी सॉफ्टवेअर तितकेच नवनवीन क्लृप्त्या शोधून त्यावर मात करणारे हॅकर्स, पुन्हा त्यांचा सामना करणारे सायबर एक्स्पर्ट्स ही लढाई अविरत चालूच राहते. मोबाईल हॅक झाल्यावर तुमच्या मोबाईलमधल्या
कॉन्टॅक्ट लिस्टपासून ओटीपीपर्यंतचा सगळय़ा गोष्टींचा ताबा हॅकरला मिळतो. थोडक्मयात तुमचा मोबाईल हॅकरच्या ताब्यात जातो.
2. संशयास्पद लिंक्स ः आपल्याला व्हॉट्स अपवर अथवा एसएमएसमधून येणाऱया विविध लिंक्स, टिकटॉक किंवा तत्सम ऍप्सच्या माध्यमातून होणारे सायबर ऍटॅक्स अशा अनेकप्रकारे आपला मोबाईल हॅक केला जाऊ शकतो. अनेकजण मोबाईलवरून आपले वैयक्तिक तसेच ऑफिसचे ई-मेल्सही तपासतात. आपल्या ई-मेल्समध्ये मोठय़ा कंपनीमधून अप्लाय केल्याशिवाय येणारी नोकरीची ऑफर, लॉटरी ई-मेल्स, गिफ्ट व्हाउचर, व्हीडिओ, इत्यादीच्या लिंक्स अशा अनेकप्रकारच्या लिंक्स असतात ज्यांना क्लिक केल्यावर तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. व्हॉट्स अप किंवा सोशल मीडिया अनइन्स्टॉल करणे किंवा पुन्हा कधीही व्हीडिओ लिंकवर क्लिक न करणे, हे या समस्येचे उत्तर नक्कीच नाही. आपल्याला संशयास्पद लिक्स ओळखता आल्या पाहिजेत. यासंदर्भात माहिती करून घेणे आवश्यक आहे. इंटरनेट सर्च केल्यास असे कितीतरी माहितीपूर्ण ब्लॉग्ज वाचायला मिळतील.
आपल्या मोबाईलला हँकिंगपासून कसे वाचवाल?
आपला मोबाईल म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्याचा आरसा असतो. त्यामुळे त्याची सुरक्षा ही गोष्ट खूप महत्त्वाची परंतु दुर्लक्षित केली जाणारी गोष्ट आहे. काही गोष्टी मूलभूत पण अत्यंत महत्त्वाच्या असतात. पण त्या आपण करतो का, हा मुख्य प्रश्न आहे. गोष्टी अगदी साध्या असतात. उदा. आपला फोन व त्यावरील ऍप्स आपण नियमित अपडेट करतो का? तसे केले नाही तर जुन्या ऍप्सचा वापर करून हॅकर्स फोनचा ताबा मिळवू शकतात. अनेक प्रकारच्या ऍप्सनी आपल्या मोबाइलमधली मेमरी पूर्ण भरलेली असते. पण त्याचवेळी एखादे विश्वसनीय ‘सिक्मयुरिटी ऍप’ आपण डाउनलोड केलेले आहे का? असतील तर, ती अपडेट केली आहेत का? गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल प्ले स्टोअरमध्ये अशी काही विश्वसनीय ऍप्स आहेत जी मालवेअर आणि फिशिंग अटॅकपासून आपल्या मोबाईलचे रक्षण करतात. यामध्ये ‘फ्री व पेड’ असे दोन्ही प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात. पेड व्हर्जन उत्तम असते आणि फ्री व्हर्जन चांगले नसते, असा गैरसमज अजिबात करून घेऊ नका. प्रत्येक ऍपच्या फ्री व्हर्जनमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सुरक्षा मिळतात याबद्दल माहिती दिलेली असते. तसेच प्रत्येक सेवेसाठी लागणाऱया शुल्काबद्दलही सविस्तर माहिती असते. पेड व्हर्जनची आवश्यकता नसेल तर फ्री व्हर्जनही तुम्ही वापरू शकता. काहीवेळा एखादा व्हायरस ‘सिक्मयुरिटी ऍप’ असल्याचे भासवून तुमच्या मोबाईलचा ताबा घेऊ शकतो. त्यामुळे कोणतेही ऍप गुगल प्लेस्टोअरवरून खात्री करूनच डाउनलोड करा. अनोळखी ई-मेल आयडी वरून येणाऱया कोणत्याही लिंक क्लिक करू नका किंवा कोणतीही फाईल डाउनलोड करू नका. ई-मेल महत्त्वाचे वाटत असल्यास त्यामधील लिंकवर क्लिक करण्याऐवजी ती टाईप करून संबंधित वेबपेज ओपन करा. वेबसाईट ओपन करताना लिंकच्या शेवटी .in, .Com, .edu, .org, F. असल्याची खात्री करा. बँकेचे पासवर्ड कधीही मोबाईलच्या मेमरीत (एसडी कार्ड) स्टोअर करून ठेवू नका. आपले आवडते ई-वॉलेट कितपत सुरक्षित आहे याची खात्री करा.
मोबाईल हॅक झाल्याचे कसे समजेल?
आपल्या सर्व प्रयत्नानंतरही हॅकर्स आपल्या डिव्हाइसवर कब्जा करू शकतात. जर आपल्या मोबाइलवर सुरक्षा ऍप नसेल तर, हे समजणे जवळजवळ अशक्मय आहे. परंतु कधीकधी मोबाईल फोन जास्त न वापरता फोनची बॅटरी लवकर संपणे हा देखील हॅकिंगचा संकेत असू शकतो. मोबाइल क्रिप्टो मायनिंगसाठी वापरला जात असल्यास असा अनुभव येतो. क्रिप्टो मायनिंग म्हणजे क्रिप्टो करन्सीमध्ये वापरले जाणारे एक मालवेअर आहे. मोबाईल हॅक झाल्याची काही लक्षणे म्हणजे मोबाईल सतत हँग होणे, काही ऍप्स अचानक क्रॅश होणे, मोबाईल ऑटो रिस्टार्ट होणे, एखादे ऍप बंद करूनही पुन्हा चालू होणे किंवा बंद करता न येणे, इंटरनेट डेटाचा जास्त वापर होणे, आऊटगोईंग कॉल लॉगमध्ये आपण डायल न केलेला नंबर दिसणे किंवा एखादा न केलेला मेसेज आउटबॉक्समध्ये दिसणे.
एक लक्षात घ्या की हे सर्व मोबाईलमधील तांत्रिक अडचणींमुळेही होऊ शकते. त्यामुळे यामागे हँकिंग हेच कारण आहे असे समजून घाबरून जाऊ नका किंवा काहीतरी तांत्रिक अडचण असेल, या भ्रमातही राहू नका. आपल्या मोबाईलची सुरक्षा आपल्याच हातात असते. तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या खाजगी फोटोंसोबत, काही महत्त्वाची माहिती, अनेक फोन नंबर्स जतन केलेले असतात. याशिवाय तुम्ही आर्थिक व्यवहारही करत असता. त्यामुळे ‘आपला मोबाईल सुरक्षित आहे का’ या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करा आणि आपल्या मोबाईलला हॅकिंगपासून वाचवा.
विनायक राजाध्यक्ष








