बेळगाव ता.पं.चा कार्यभार 24 फेब्रुवारीपासून सांभाळणार : नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होईपर्यंत साहाय्यक सचिवांकडेच पदभार
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांचे वारे थंडावले असून आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचाही कार्यकाळ संपला आहे. या जागेवर आता शासकीय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात येणार असून निकालानंतर संबंधित अधिकाऱयांकडे पदभाराची सूत्रे देण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जोपर्यंत तालुका पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होत नाही तोपर्यंत या अधिकाऱयांकडे पदभार स्वीकारण्याची मुभा आहे. निवडणूक होताच त्यांच्याकडून ही सूत्रे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
कर्नाटक पंचायत राज्य अधीनियम 1993 कलम 239 नुसार हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पदभार संबंधित जिल्हा पंचायतच्या उपसचिवांकडे सोपविण्यात येणार आहे. बेळगाव जिल्हय़ातील दहा तालुका पंचायतमध्ये ही निवड करण्यात येणार आहे. अथणी, बेळगाव, बैलहोंगल, चिकोडी, गोकाक येथील तालुका पंचायतीचा पदभार जिल्हा पंचायतीच्या उपसचिव-1 यांच्याकडे राहणार आहे. हुक्केरी, खानापूर, रायबाग, रामदुर्ग, सौंदत्ती यांचा कारभार जिल्हा पंचायतीचे उपसचिव-2 यांच्याकडे देण्यात आला आहे.
जानेवारीच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक तालुका पंचायत ओस पडली होती. निवडणुकीच्या पूर्वतयारीत व मोर्चेबांधणीतच अधिकतर तालुका पंचायत सदस्य गुंतले होते. यामुळे मागील अनेक दिवसांपासून तालुका पंचायत कार्यालये सुनेसुने वाटत होते. यामुळे केवळ तालुका पंचायत कर्मचाऱयांशिवाय कार्यालयात कोणच दिसत नव्हते. येत्या 23 रोजी निकाल जाहीर होणार असून लवकरच पुन्हा कार्यालयात गर्दी होणार आहे. मात्र सध्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यभार उपसचिवांकडे राहणार आहे.
जिल्हय़ातील तालुका पंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपत आला असून अथणी तालुक्यातील अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या कार्यकाळाला 22 जुलै 2014 रोजी सुरुवात झाली होती. आता तो 22 फेब्रुवारी 2016 मध्ये संपला आहे. बेळगाव 10 जून 2014 रोजी सुरू तर 24 फेब्रुवारी 2016 रोजी संपला आहे. बैलहोंगल 10 जुलै 2014 रोजी सुरू, 17 फेब्रुवारी 2016 रोजी संपला. चिकोडी 21 जुलै 2014 रोजी सुरू तर 20 फेब्रुवारी 2016 रोजी संपला. गोकाक 2 जुलै 2014 रोजी सुरू, 2 फेब्रुवारी 2016 रोजी संपला, हुक्केरी 5 जुलै 2014 रोजी सुरू, 25 फेब्रुवारी 2016 रोजी संपला, खानापूर 7 जुलै 2014 रोजी सुरू, 27 फेब्रुवारी 2016 रोजी संपला, रायबाग 4 सप्टेंबर 2014 रोजी सुरू तर 24 फेब्रुवारी 2016 रोजी संपला.
रामदुर्ग 17 जुलै 2014 सुरू, 16 फेब्रुवारी 2016 ला संपला आणि सौंदत्ती तालुका पंचायतचा कार्यकाळ 8 जुलै 2014 रोजी सुरू तर 14 फेब्रुवारी 2016 रोजी संपला आहे.
जिल्हय़ातील तालुका पंचायतमध्ये संपलेला कार्यकाळ आणि उपसचिवांची नियुक्ती
| जिल्हय़ातील तालुके | जि. पं. अधिकाऱयांची नियुक्ती | संपलेला कार्यकाळ |
| अथणी | उपसचिव-1 | 22 फेब्रुवारी 2016 |
| बेळगाव | उपसचिव-1 | 24 फेब्रुवारी 2016 |
| बैलहोंगल | उपसचिव-1 | 17 फेब्रुवारी 2016 |
| चिकोडी | उपसचिव-1 | 20 फेब्रुवारी 2016 |
| गोकाक | उपसचिव-1 | 20 फेब्रुवारी 2016 |
| हुक्केरी | उपसचिव-2 | 25 फेब्रुवारी 2016 |
| खानापूर | उपसचिव-2 | 27 फेब्रुवारी 2016 |
| रायबाग | उपसचिव-2 | 24 फेब्रुवारी 2016 |
| रामदुर्ग | उपसचिव-2 | 16 फेब्रुवारी 2016 |
| सौंदत्ती | उपसचिव-2 | 14 फेब्रुवारी 2016 |









