अमरुल्लाह सालेह यांचे प्रतिपादन- विरोध वाढत असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानात बळाचा उपयोग करून कब्जा मिळविलेल्या तालिबानची राजवट अधिक काळ टिकू शकणार नाही, असे मत प्रदर्शन त्या देशाचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी केले आहे. सध्या सालेह पंजशीर या भागात असून तेथूनच तालिबानला सर्वाधिक विरोध होत आहे.
तालिबानची राजवट अफगाणिस्तानची संस्कृती आणि अफगाण लोकांची मानसिकता यांच्या विरुद्ध आहे. अफगाणिस्तानातील लोक तालिबानचे कायदे मानण्याच्या परिस्थितीत नाहीत. काही मूटभर लोक बळजोरी करून संपूर्ण देशाचा नेता निवडतात किंवा देशावर आपली राजवट लादतात हा प्रकार अफगाणिस्तानच्या जनतेला सहन होणे कदापिही शक्य नाही. लवकरच तालिबानला मोठय़ा संकटाला तोंड द्यावे लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विरोधही वाढला
एकीकडे तालिबान अफगाणिस्तानवरील आपली पकड अधिक घट्ट करण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे त्याला विरोधही वाढत आहे. पंजशीर खोऱयाप्रमाणेच इतर काही प्रांतांमध्येही स्थानिक नेत्यांच्या नेतृत्त्वात लोक एकत्र येऊन तालिबानला विरोध करत आहेत. सध्या बहुतेक स्थानिक नेते आणि वॉर लॉर्डस् थांबा आणि वाट पहा या भूमिकेत आहेत. तथापि आणखी काही काळानंतर त्यांच्या संयमाचा कडेलोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत या देशाला यादवी युद्धाला तोंड द्यावे लागू शकते, असेही भाकीत तज्ञांनी केले आहे.
भवितव्य जगाच्या हाती
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळविला असला तरी देश चालविणे सोपे नाही. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैसा आणि अनुभवी यंत्रणेची आवश्यकता असते. विशेषतः शांततेच्या मार्गाने आणि कायद्याच्या माध्यमातून देश चालविण्यासाठी बरीच तारेवरची कसरत संयमाने करावी लागते. तालिबानची कार्यपद्धती हिंसाखोर आणि आक्रमक असल्याने या संघटनेसमोर अडचणी उभ्या राहू शकतात. उद्ध्वस्त झालेल्या या देशाला मार्गावर आणण्यासाठी तालिबानला आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता लागणार आहे. तथापि बहुतेक राष्ट्रे सध्याच्या परिस्थितीत तरी तालिबानला मान्यता देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
तालिबानचे हस्तक पंजशीरमध्ये?
तालिबानविरोधी नेते पंजशीर खोऱयात एकवटले असून त्यांचा बिमोड करण्यासाठी तालिबानने आपले शेकडो हस्तक पाठविल्याचा दावा केला आहे. यापैकी काही पथके पंजशीरमध्ये प्रवेशली असून त्यांनी आपले कार्य सुरू केले आहे. ही माहिती तालिबनच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य अनामुल्ला समागानी यांनी दिली. अफगाणिस्तान आता इस्लामिक अमिरात झाला असून पंजशीरमध्ये त्याने कोणत्याही हिंसाचाराशिवाय किंवा रक्तपाताशिवाय प्रवेश केला असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, त्याची स्वतंत्र पडताळणी होऊ शकली नाही.
अफगाणिस्तानचे रुपांतर कारागृहात
तालिबानच्या पुनरागमनानंतर अफगाणिस्तानचे रुपांत जणू एका कारागृहात झाले आहे. बहुतेक लोकांनी घराबाहेर न पडणे श्रेयस्कर मानले आहे. सरकारी कार्यालये, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये व इतर आस्थापनांमध्ये लोकांची उपस्थिती नसल्यात जमा आहे. तालिबानबद्दलची भिती हे याचे कारण आहे. असे निरीक्षण अनेक विदेशी पत्रकारांनी नोंदविले आहे. जिवाच्या भीतीपोटी लक्षावधी अफगाणी नागरिक शेजारी देशांमध्ये पलायन करण्याच्या प्रयत्नात आहेत. विशेषतः तुर्कमेनिस्तानची सीमा ओलांडून तेथे प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उझ्बेकिस्तान या देशाने आपली सीमा अफगाणांसाठी बंद केली आहे.
तालिबान पुन्हा मूळ पदावर?
@देशाचा ताबा घेतल्यानंतर दिलेल्या आश्वासनांचा तालिबानला विसर
@अनेक अफगाणी नागरिकांवर सूढबुद्धीने कारवाई करण्याचे सत्र सुरू
@विश्व समुदायाच्या भूमिकेवर ठरणार तालिबानच्या राजवटीचे भवितव्य









