प्रो कबड्डी लीग : पिंक पँथर्सची यूपी योद्धावर मात, अर्जुन देशवाल, अजित कुमार यांची चमक
वृत्तसंस्था/ बेंगळूर
प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी झालेला तामिळ थलैवाज व यू मुम्बा यांच्यातील रोमहर्षक ठरलेला सामना 30-30 असा टाय झाला तर दुसऱया सामन्यात दीपक हुडाने शेवटच्या चढाईत केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे जयपूर पिंक पँथर्सने यूपी योद्धाचा तीन गुणांनी पराभव केला.
यू मुम्बा व तामिळ थलैवाज यांच्यातील सामना अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचक झाला. मुम्बाच्या व्ही. अजित कुमारने मुंबईचे निम्मे गुण नोंदवत चमकदार कामगिरी केली. तामिळला जोरदार सुरुवात करून देताना कर्णधार सुरजीत सिंग व रायडर मनजीत यांनी अनेक गुण मिळविले. मुंबईकडे त्यांच्या खेळाला प्रत्युत्तरच नव्हते असे दिसून आले. आक्रमण व बचाव या दोन्हीत मुंबई संघ कमी पडला आणि त्यांना ऑलआऊटला सामोरे जावे लागल्याने ते 8 गुणांनी मागे पडले. तामिळने ही आघाडी नंतर 12 गुणांवर नेऊन ठेवली. पण मुंबईच्या अजित कुमारने दोनदा चढाईचे गुण मिळवित आपल्या संघात थोडीशी जान भरली. सामन्यातील एक सर्वोत्तम क्षण ठरलेल्या एका चालीत अजित कुमारने तामिळच्या चारही खेळाडूंना बाद करीत त्यांना ऑलआऊट केले आणि तामिळची आघाडी फक्त दोन गुणांवर आणून ठेवली. पूर्वार्धातील शेवटचा गुण तामिळने मिळविला आणि मध्यंतराला 17-14 अशी बढत मिळविली.
उत्तरार्धातही तामिळने जोरदार सुरुवात करीत ही आघाडी 6 गुणांची केली. पण अजित कुमारने पुन्हा एकदा शानदार प्रदर्शन करीत ही आघाडी दोन गुणांनी कमी करताना तामिळला ऑलआऊट केले. अतुल एमएसने दोन गुण घेत तामिळला पुन्हा आघाडीवर नेले. पण अजित कुमार व अन्य दोन खेळाडूंनी तामिळला ऑलआऊट करीत मुंबईला प्रथमच आघाडी मिळवून दिली. दोन्ही संघांचा तोडीस तोड खेळ झाला. अशा स्थितीतही मुंबईने एक मिनिट बाकी असताना दोन गुणांची आघाडी राखली होती. बदली खेळाडू अजिंक्य पवारने एक रेडपॉईंट मिळवित मुंबईची आघाडी एका गुणावर आणली. मुंबईला सामना जिंकून देण्याची अजित कुमारला चांगली संधी मिळाली होती. पण तामिळच्या मोहितने त्याला मध्यरेषेला स्पर्श करण्यापासून रोखल्याने त्याची ही संधी गेली आणि सामना 30-30 असा टाय झाला. मुंबईच्या अजित कुमारने 15 रेडपॉईंट तर राहुल सत्पालने 2 टॅकल पॉईंट मिळविले. तामिळच्या अतुल एमएसने 7 रेडपॉईंट व साहिल सिंगने 3 टॅकल पॉईंट मिळविले.
यूपी योद्धाला अखेरच्या क्षणी पँथर्सचा धक्का
दुसऱया सामन्यात यूपी योद्धाने मुसंडी मारण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण जयपूर पिंक पँथर्सला ते 32-29 अशा गुणांनी विजय मिळविण्यापासून रोखू शकले नाहीत. या विजयानंतर ते क्रमवारीत तिसऱया स्थानावर पोहोचले. अर्जुन देशवाल व दीपक हुडा यांनी दोघांनी मिळून 20 रेडपॉईंट मिळवित जयपूरला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
दोन्ही संघांच्या रायडर्सनी शानदार सुरुवात करून देताना सामन्यातील पहिले 8 गुण त्यांनीच मिळवून दिले. पिंक पँथर्सने परदीप नरवालला रोखत पहिला टॅकल पॉईंट मिळविला आणि तीन गुणांची आघाडी घेतली. यूपी योद्धानेही नंतर एका गुणावर आणली होती. पण देशवाल व हुडा यांनी झटपट गुण मिळवित योद्धाचा फक्त एक खेळाडू मॅटवर ठेवला. पिंक पँथर्सने त्याला व्यवस्थित टॅकल करीत योद्धाला ऑलआऊट करून 15-8 अशी भक्कम आघाडी मिळविली. योद्धानेही जोरदार प्रत्युत्तर देताना सुरेंदर गिलने सुपर रेड टाकत ही आघाडी चार गुणांवर आणली. पण हुडानेही सुपर रेड टाकत मध्यतराला पिंक पँथर्सला 19-12 अशा आघाडीवर नेले.
उत्तरार्धात योद्धाने आक्रमक धोरण ठेवले. पण पँथर्सची आघाडी कमी करताना त्यांना झगडावे लागले. त्यांच्या बचावफळीने अखेर पँथर्सला गुण देणे थांबवत आपले गुणही वाढविले. मात्र पँथर्सची आघाडी सात गुणांची राहील, याची त्यांची बचावफळी व देशवाल यांनी दक्षता घेतली. शेवटच्या पाच मिनिटात रोहित तोमरने खेळाचा नूर पालटला त्याने एक रेडपॉईंट मिळविला आणि टॅकलचा गुणही मिळवित पँथर्सची आघाडी 5 गुणांवर आणली. 10 सेकंद असताना देशवालकडून झालेली चूक आणि तोमरच्या आणखी 2 रेडपॉईंटमुळे पँथर्सची आघाडी योद्धाने 2 गुणांवर आणून ठेवली. तोमरने आणखी एक गुण घेत ती एकवर आणली. मात्र हुडाने शेवटच्या रेडमध्ये खोलवर जात दोन गुण मिळवित तीन गुणांनी विजय निश्चित केला.
आजचे सामने
1) दबंग दिल्ली वि. बंगाल वॉरियर्स
वेळ ः रात्री 7.30 वा.
2) यूपी योद्धा वि. गुजरात जायंट्स
वेळ ः रात्री 8.30 वा.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.









