2 आमदार भाजपमध्ये सामील ः माजी क्रिकेटपटू मोंगिया, अकाली नेते घुडियानांचाही प्रवेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाब काँग्रेसमध्ये भाजपने खिंडार पाडले आहे. गुरदासपूरच्या कादियां मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार फतेहजंग सिंह बाजवा आणि श्रीहरगोविंदपूरचे आमदार बलविंदर सिंह लाडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया आणि अकाली दलाचे माजी आमदार गुरतेज सिंह घुडियाना यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. या सर्व नेत्यांचे भाजपचे पंजाब प्रभारी गजेंद्र शेखावत यांनी पक्षात स्वागत केले.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी फतेहजंग यांच्याकरता प्रचारसभा घेतली होती. सिद्धू यांनी फतेहजंग यांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले होते. फतेहजंग बाजवा हे पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख खासदार प्रतापसिंह बाजवा यांचे बंधू आहेत. फतेहजंग हे कादियां मतदारसंघातून दुसऱयांदा निवडणूक लढविण्याचे दावेदार होते. परंतु अचानक त्यांचे ज्येष्ठ बंधू प्रताप बाजवा यांनी तेथून दावेदारी केल्याने फतेहजंग यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे पाऊल उचलले आहे.
फतेहजंग बाजवा हे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे निकटवर्तीय राहिले आहेत. पंजाबच्या माझा भागातील दिग्गज नेते अशी त्यांची ओळख आहे. परंतु मागील काही दिवसांपासून राज्याचे मंत्री तृप्त राजिंदर बाजवा यांच्यासोबत त्यांचा राजकीय संघर्ष सुरू होता. तर उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा यांच्यावरही फतेहजंग नाराज होते.
फतेहजंग बाजवा यांच्या मुलाला कॅप्टन अमरिंदर मुख्यमंत्री असताना शासकीय नोकरी मिळाल्यावर रंधावा यांनी विरोध केला होता. परंतु कॅप्टन मुख्यमंत्रिपदावरून हटल्यावर रंधावा यांचा जावई तरुणीवर लहलला अतिरिक्त महाधिवक्तेपद देण्यात आले होते.









