9 जिल्हय़ांमध्ये स्थानिक सुटी घोषित – पाणी साचल्याने समस्येत वाढ
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत मागील 4 दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. सखल भागांमध्ये पाणी जमा झाले असून रस्त्यांवर तलावांसारखी स्थिती दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने बुधवारी कुड्डालोर, विलुप्पुरम, शिवगंगा, रामनाथपुरम आणि कराईकलमध्ये रेड अलर्ट दिला आहे. तामिळनाडू आणि पुड्डुचेरीत अतिवृष्टीचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे.
राज्य सरकारने अतिवृष्टीचा पुर्वानुमान पाहता चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, कुड्डालोर, नागापट्टणम, तंजावूर, तिरुवरूर आणि मयिलादुथुराई या 9 जिल्हय़ांमध्ये 10-11 नोव्हेंबर रोजी स्थानिक सुटी घोषित केली आहे. कोइम्बतूरमध्ये शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
सातत्याने पडणाऱया पावसामुळे अनेक जिल्हय़ांमध्ये लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. रस्त्यांवर पाणी साचले असून अनेक ठिकाणी लोकांच्या घरांमध्ये दोन फुटांपर्यंत पाणी शिरले आहे.
हवामान विभागाने डेल्टा डिस्ट्रिक्ट, कुड्डालोर, विल्लुपुरम, पुदुकोट्टई, शिवगंगा, रामनाथपुरम आणि कराईकलमध्ये विविध ठिकाणी अत्यंत अधिक पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. तर चेन्नई, तिरुनेलवेली, कन्याकुमारी, थेनकासी, विरुधुनगर, मदुराई, अरियालुर, पेरम्बलूर, कांचीपुरम, तिरुवल्लूर आणि चेंगलपट्टू जिल्हय़ांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अनुमान आहे.









