वैज्ञानिकांनाही करता आली नाही रहस्याची उकल
मूळात निसर्गच कमालीचा अनोखा आहे. येथे अशा गोष्टी दिसून येतात, ज्या विचार करायला भाग पाडतात. अमेरिकेत एक अशी निसर्गाचा चमत्कार न्यूयॉर्कच्या चेस्टनट रिज पार्कमध्ये दिसून येतो. तेथे एटर्नल फ्लेम फॉल नावाच्या झऱयादरम्यान आगीची एक ज्वाळा दिसून येते. येथे येणारा प्रत्येक जण हे अजब दृश्य पाहून थक्क होतो.
एटर्नल फ्लेम फॉलमध्ये वर्षभर पाणी वाहत राहते. हा झरा कधीच कोरडा पडत नाही आणि पाण्यामधील एक ज्वाळा नेहमीच पेटताना दिसून येते. हे अद्भूत दृश्य पाहण्यासाठी लोक ठिकठिकाणाहून येत असतात. तसेही भारताच्या हिमाचल प्रदेशातही ज्वालादेवी मंदिरात अशीच एक रहस्यमय ज्योति नेहमीच पेटत राहते.
अमेरिकेतील या झऱयावरून सर्वसामान्य लोकांमध्ये विविध प्रकारच्या कहाण्या आणि दंतकथा पसरल्या आहेत. पाण्यामध्ये तग धरणाऱया अग्निज्योतिमागे दैवी चमत्कार असल्याचे बहुतांश लोक मानतात. हे निसर्गाचे न सुटलेले कोडं आहे. पृथ्वीवर महाप्रलयासारखी घटना घडल्यावर ही ज्योत विझणार असे काही जणांचे मानणे आहे. ज्योत पेटत राहणे याचा अर्थ सर्वकाही सुरळीत आहे असेही ते मानतात.
वैज्ञानिकांचे प्रयत्न
हे रहस्य सोडविण्यासाठी अनेकदा संशोधन करण्यातआले आहे. ही ज्योत कशामुळे पेटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांनी कित्येकवेळा केला आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात मिथेन वायू असणे यामागे कारण असू शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे. झऱयाखालील गुहेत मिथेन वायू बाहेर पडतो, कित्येक वर्षांपूर्वी तेथे कुणीतरी आग लावली असेल आणि तेव्हापासून पाण्यात असूनही ही आगीची ज्योत जिवंत राहिल्याचा दावा करण्यात येतो.









