आरोग्य कर्मचाऱयांना इन्सेटिव्ह न देणे, त्यांच्या राहण्याचे ठिकाणाची व्यवस्था न करणे, इतकेच नव्हे तर कोविडने मृत्यू झाल्याची नोंदही न ठेवणे अशासारख्या चुका सध्या सरकारी यंत्रणेकडून होत आहेत. याचा रोष पसरत असतानाच ‘माझा डॉक्टर’ बोलून कर्तव्याचीच जाणीव करून देणे म्हणजे आरोग्य कर्मचाऱयांप्रती जबाबदारी झिडकारण्यासारखेच आहे.
गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाविरोधातील लढय़ात आरोग्य कर्मचाऱयांचे योगदान अधिक ठसठशीत दिसून येत आहे. सध्या राज्यातील आणि मुंबईतील उतरत चाललेली रुग्ण संख्या म्हणजे त्यांच्या लढय़ाची फलश्रुती आहे. मात्र हा लढा लढत असताना डॉक्टर, परिचारिका तसेच इतर वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी अनुभवातून असमाधान व्यक्त करतात.
गतवर्षीच्या पहिल्या लाटेत डॉक्टरांसह सगळे वैद्यकीय कर्मचारी कोरोनाबाबत अनभिज्ञ होते. या आजाराची लक्षणे, त्यावरील उपचार, घ्यावी लागणारी काळजी अशा बऱयाच गोष्टी वैद्यकीय क्षेत्रालादेखील ठाऊक नव्हत्या. गेल्या वर्षभरात मात्र किमान रुग्णाच्या उपचारातील प्रोटोकॉल ठरत गेले आणि डॉक्टरांनी ठरल्याप्रमाणे उपचार सुरू केले. त्यातून सकारात्मक चित्र उभे राहत आहे. सध्या दुसरी लाट सुरू आहे. बदलत्या लाटेत उपचारातील प्रोटोकॉल बदलून रुग्णांचे जीव वाचविण्याचे काम केले जात आहे. या दुसऱया लाटेत मात्र डॉक्टरांना अधिक कुचंबणा सहन करावी लागत आहे. रुग्णसंख्या, मृत्यू, पहिली लाट, दुसरी लाट रुग्णालयातील अशी स्थिती असतानादेखील डॉक्टरांनी हताश न होता शस्त्र बाजूला ठेवलेली नाहीत. सध्या दुसऱया लाटेत रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. दररोज प्रत्येक आयसीयूमध्ये दोन ते चार मृत्यू होत आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येत होणारे रोजचे मृत्यू डॉक्टरांनी यापूर्वी कधी अनुभवलेदेखील नव्हते. पहिल्या लाटेदरम्यान सरकारने डॉक्टरांची काळजी घेत किमान सरकारी डॉक्टरांना हॉटेल, मंगल कार्यालये, लॉजसारख्या ठिकाणी कुटुंबापासून लांब वेगळ्या ठिकाणी राहण्याची सोय केली होती. तसेच कोविड डय़ुटीनंतर आठ दिवसांचा ब्रेक मिळत असे.
सध्याच्या लाटेत मात्र बहुतांश डॉक्टरांना राहण्याचे ठिकाण नाही. तसेच दोन दिवसांचा ब्रेक घेऊन कोविड डय़ुटी करा असा नियम सांगण्यात येत आहे. कोविड संसर्ग झाल्यास 10 दिवस आराम करून कोविड डय़ुटी करा असाही नियम सांगण्यात येत आहे. तर दुसऱया बाजूला रुग्णांना कोविड संसर्ग झाल्यास किमान 14 दिवस क्वारंटाईन केले जाते. डॉक्टरांना मात्र 10 दिवसांचा नियम ठेवण्यात आला आहे. कित्येक डॉक्टर आरोग्य कर्मचारी कामाच्या ठिकाणी राहून कोविड डय़ुटी करत आहेत. अशा अनेक प्रश्नातील असंतुष्टता वाढत असून ठिकठिकाणी आंदोलन होण्यास सुरुवात झाली आहे. हेल्थ केअर वर्करना त्रास होत असताना सरकार ढिम्म असल्याचा आरोप डॉक्टरांकडून होत आहे. प्रत्येकाने आपापली काळजी घेऊन कोविड डय़ुटी करावी असे अलिखित आदेश असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्याचवेळी डॉक्टरांना सांगण्यात आलेले इन्सेंटिव्हदेखील देण्यात येत नाही. पहिल्या लाटेदरम्यान हरियाणा राज्याने 40 टक्के तर गोव्याने 20 टक्के अतिरिक्त इन्सेंटिव्ह पगारातून दिला.
यावेळी मात्र कोणत्याही राज्याने तसे पाऊल उचलले नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. डॉक्टरना इन्सेंटिव्ह अपेक्षित नसून आरोग्य क्षेत्राबाबत किमान काळजी तरी व्यक्त करा अशी अपेक्षा हे डॉक्टर करत आहेत. दोन्ही लाटेत सर्व वयोगटातील डॉक्टर कोविडने मृत्यूमुखी पडले आहेत. पहिल्या लाटेत मृत्यू झालेल्या डॉक्टरांमध्ये 60 ते 70 वयोगटातील अधिक संख्या होती. तर आता दुसऱया लाटेदरम्यान तरुण डॉक्टरांची मृत्यूसंख्या वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र कोविडने मृत्यू झालेल्या डॉक्टरांची नोंद कोणतीही सरकारी यंत्रणा ठेवत नसल्याची खंत डॉक्टर व्यक्त करत आहेत. डॉक्टर मृत्यू झाल्यास सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे मृत्यू नोंद ठेवली जात आहे.
मागच्या वर्षभरात देशभरातील कोविडने मृत्यू पावलेल्या निव्वळ 288 हेल्थ केअर वर्कर्सना प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत 50 लाखाचा विमा देण्यात आला असल्याची केंद्र सरकारची नोंद सांगते. 288 ही संख्या अत्यल्प असून याचा दुसरा अर्थ डॉक्टर, परिचारिका किंवा इतर वैद्यकीय कर्मचाऱयांच्या कोविडने मृत्यू झाल्याची नोंदच ठेवण्यात येत नसल्याचे स्पष्ट होत आहे. याचा अर्थ प्रशासकीय पातळीवर अक्षम्य हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोविड डेथ रजिस्ट्री समितीच्या डॉ. रवी वानखेडकर यांनी केला आहे. या समितीकडून आता देशभरातील कोविडने मृत्यू पावलेल्या डॉक्टरांच्या नोंदीचे काम सुरू आहे. सध्या एखाद्या डॉक्टरांचा कोविडने मृत्यू झाल्यास सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे लिंग आणि वयाची नोंद करत कुटुंबीयांना कळविले जात आहे.
आरोग्य कर्मचाऱयाचा कोविडने मृत्यू झाल्यास सरकारला विम्याचे पैसे द्यावे लागतील असे नोंदी न करण्यामागील कारण असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर कोविडने मृत्यू झालेल्या डॉक्टरांची संख्या समजल्यास इतर डॉक्टरांच्या कामावर परिणाम होऊ शकतो असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱयाना देण्यात येणारी वागणूक ही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील समस्या झाली आहे. महामारी सुरू झाल्यापासून सर्वच आरोग्य कर्मचाऱयांचे विश्व हादरून गेले आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आरोग्य कर्मचाऱयांनीदेखील आपल्या कुटुंबातील प्रियजन गमावले आहेत. कित्येकांनी कोविड आजारातील मरणासन्न यातना भोगून नव्याने पुन्हा रुग्णसेवा सुरू केली आहे. त्यांचा लढा सुरूच आहे. सद्यस्थितीत त्यांना दुखावून चालणार नाही. बारा तास पीपीई किटमध्ये राहून रुग्णसेवेचे काम ते करत आहेत. महामारीमुळे जगातील आर्थिक स्थिती डबघाईला आली असल्याची जाणीव यानादेखील आहे. उच्चरवातील घोषणांपेक्षा आरोग्य कर्मचाऱयांची जबाबदारीने काळजी घेतल्यास कोरोना लढय़ातील चित्र अधिक यशस्वी होण्यास मदत होईल.
राम खांदारे








