अध्याय सातवा
यदुमहाराज आणि अवधुतांच्या संवादाचा आपण परामर्ष घेत असून अवधुतानी पृथ्वीला गुरु का केले ते आपण जाणून घेतले. आता पुढील गुरुंच्या गुणांची चर्चा करू. वायू अवधुतांचा दुसरा गुरु आहे. शरीरातील वायू भेदभाव न बाळगता सर्वांच्या प्राणाचे संरक्षण करतो. त्याची विशि÷ अशी कोणतीही मागणी नसते. तसेच बाह्य वायू म्हणजे वाऱयाचा गुण असा की तो कुठेही गुंतून पडत नाही. अवधूत म्हणतात योग्याने भेदभाव करू नये तसेच कुठेही गुंतू नये.
आकाश हा अवधुतांचा तिसरा गुरु होय. आकाश सर्व वस्तुविषयी समभाव ठेवणारे आहे ते असंग, अभेद्य, निर्मळ आहे म्हणून अवधुतानी त्याला गुरु केले. त्याचे कोणाशीही वैर नसते. योग्यानेही असेच वागले पाहिजे.
आकाश जसे सर्वव्यापी असते तसे योग्याने सर्वत्र असावे. आकाशाला कोणीही अपाय करू शकत नाही तसेच योग्याच्या मनःस्थितीत सुखदुःखामुळे काहीही फरक पडत नाही. आकाश आपल्या जागेवर जसेच्या तसे असते. तसाच योगीही कायम स्थिर असतो. काळ सर्वांच्यावर मात करतो पण त्याचे आकाशापुढे काहीही चालत नाही. आकाशाला शस्त्राचा घावही काही करू शकत नाही. आकाश डोहात बुडालेले दिसते पण पाण्याने कधीही ओले होत नाही. त्याप्रमाणे योगीही अलिप्त असतो. आकाशाला चिखल माखण्याचा प्रयत्न केला तर तो माखणाऱयालाच लागतो. आकाश जसे सर्व दृष्टय़ा अलिप्त असते तशीच योग्याची मनःस्थिती असल्याने योगी काळावर मात करून कालातीत होतो व अनेक वर्षे तपश्चर्या करू शकतो. अवधूत ऊर्फ दत्तगुरुंचे चौथे गुरु जल म्हणजे पाणी आहे. जल हे स्वभावतःच अति निर्मळ असते. मधुर, मृदू आणि पवित्र असते. साधक असाच हवा! पाण्याच्या संपर्कात जो येतो त्याचा मलीनपणा ते काढून टाकते पण त्याचा त्याला अहंकार असत नाही. तसाच योग्यालाही अहंकार नसावा. पाणी वरवरचा मळ काढते पण योगी मानवाला अंतर्बाह्य शुद्ध करतो आणि कायमस्वरूपी सुख देतो.
योग्याचे दर्शन घडणे शक्मय नसल्यास स्मरण करावे, म्हणजे संसारातील संपूर्ण दुःख नाहीसे होते. अवधुतांचे पाचवे गुरु अग्नी आहेत. अग्नी तेजाने देदीप्यमान असतो. योग्यानेही भगवतभक्तीने अग्निप्रमाणे देदीप्यमान असायला हवे. अग्नी ज्याच्याकडे मोहरा वळवतो त्याला जाळून आपल्यासारखा करून सोडतो. त्याप्रमाणे योगी सगळय़ांच्याकडे आत्मदृष्टीने पाहतो व त्यांचे दोष नष्ट करून आत्मज्ञानाने त्यांचा स्वीकार करतो. अवधुतांचा सहावा गुरु चंद्र आहे. चंद्राच्या कला शुक्ल पक्षात वाढतात, कृष्ण पक्षात कमी होतात, याने चंद्राला काहीच फरक पडत नाही. योग्यानेही हे ओळखून असावे की जन्ममृत्यू षड्?विकार हे देहालाच लागू असतात तर आत्मा अविनाशी, निर्विकार, अनंत, अपार, आत्मस्वरूपात मग्न असतो. त्याप्रमाणे योग्याने देहाच्या सोबतीने न राहता निजरूपात अखंडपणे परिपूर्ण रहावे. म्हणजे योगी काळाच्या पलीकडे जाऊन कालातीत होतो. अवधूत म्हणाले काळाची गती अदृश्य असते पण त्यानुरूप काम करून लोकांना संतोष वाटेल असे कार्य कसे करावे हे मला सूर्याकडे पाहून समजले म्हणून मी त्याला सातवा गुरु केला. सूर्य जल शोषून घेतेवेळी तसेच पाऊस पाडतेवेळी जसा अलिप्त असतो तसा योगी विषयापासून पूर्णपणे अलिप्त असतो. अवधुतानी कपोत पक्षाला आठवा गुरु केले. कपोताच्या कुटुंबातील पिले पारध्यांच्या जाळय़ात अडकली म्हणून कोपोताची पत्नी आणि नंतर स्वतः कपोताने स्त्री पुत्रांच्या मोहापायी जीव दिला अशा प्रकारे अविवेकाने कुटुंबाची आसक्ती बाळगत कपोत मरण पावला पण त्याने भगवंत प्राप्ती काही करून घेतली नाही. जन्माला येऊन जो भगवंत प्राप्तीचे उद्दिष्ट ठेवत नाही तो आयुष्य व्यर्थ घालवतो. कपोताप्रमाणे जो कोणी संसारात अडकलेला असतो त्याचा काळ सर्वथा विनाश करून टाकतो. कुटुंब पोषणात आसक्त झालेला कौटुंबिक मनुष्य सर्व कुटुंबाचा घात करून जन्म वाया घालवतो. म्हणून कुटुंबविषयक कर्तव्ये पार पडल्यावर माणसाने त्यापासून अलिप्त व्हावे.
(अध्याय सातवा समाप्त)







