मागच्या दीड वर्षांपासून देशभर कोरोनाने थैमान घातलेले असताना आता डेंग्यूने भारतातील अनेक शहरांना विळखा घातल्याचे दिसत आहे. कोरोनाप्रमाणे डेंग्यूही आपले रुप बदलत असून, या नव्या स्ट्रेनने आरोग्य व्यवस्थेपुढे नवी डोकेदुखी निर्माण केली आहे. अर्थात स्वच्छता, सजगतेतून डेंग्यूच्या या नव्या अवतारावर नियंत्रण मिळविणे नक्कीच शक्य आहे.
पावसाळा हा साथीच्या आजारांसाठी अनुकूल काळ मानला जातो. पावसाचे साचलेले पाणी आणि त्यात निर्माण होणाऱया डासांपासून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. देशात सध्या कोरोनाची साथ सुरू असून, या साथीचा प्रभाव बऱयाच अंशी कमी झालेला पहायला मिळतो. असे असले, तरी यंदा डेंग्यूने मोठय़ा प्रमाणात आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले आहे. पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, अमरावतीसह महाराष्ट्रातील काही शहरांत डेंग्यूचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसत असून, राज्यात जवळपास सहा ते साडेसहा हजारांच्या आसपास या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात महाराष्ट्र, कर्नाटकसह 11 राज्यांना केंद्राकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
11 राज्यात डेंग्यूची स्थिती चिंताजनक
तसा डेंग्यूचा आजार हा देशासाठी नवीन नाही. मागच्या दहा ते पंधरा वर्षांचा आढावा घेतला, तर महाराष्ट्रासारख्या राज्यात विशेषतः पावसाळा आणि पावसाळय़ानंतर डेंग्यूची साथ जोर धरते. डेंग्यूचे 4 प्रकारचे व्हेरियंट असून, ते डीईएनव्ही या नावाने ओळखले जातात. मात्र, 11 राज्यांमध्ये डेंग्यूचा आता नवीन प्रकार आढळून आला आहे. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, दिल्ली या राज्यांचा समावेश असून, आरोग्य तज्ञांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. डेंग्यू अजूनही नियंत्रणात असला, तरी त्याचा नवीन प्रकार म्हणजे डेंग्यू-2 ची अनेक प्रकरणे देशभरातून नोंदवली जात आहेत. डेंग्यूच्या अनेक प्रकारांपैकी डेंग्यू-2 हा सर्वांत धोकादायक प्रकार असल्याचे सांगितले जात आहे.
सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्ण
मागील 3 महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. लहान मुलांपासून मोठय़ा माणसांमध्येही ताप आणि अंगदुखीची लक्षणे जाणवत आहेत. काही दिवसांपासून सुरू असलेला सततचा पाऊस, विविध वसाहतींमध्ये सुरू असलेली रस्त्याची कामे, घराभोवती साचलेले पाणी यामुळे डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती होत आहे.
महाराष्ट्रातील महानगरांना विळखा
महाराष्ट्रातील मोठय़ा शहरांमध्ये प्रामुख्याने डेंग्यूचे रुग्ण लक्षणीयरीत्या आढळत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. काही वेळेस डेंग्यूची चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह येत आहे. मात्र रुग्णाच्या शरीरारातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होणे, तीव्र ताप येणे, अंगावर चट्टे येणे, थंडी वाजून येणे आदी लक्षणे दिसून येत आहेत.
चेन्नईत रुग्णांची वाढती संख्या

दक्षिण भारतात तामिळनाडूतील आरोग्य अधिकाऱयांनी चेन्नईच्या स्थानिक नागरिकांना डेंग्यूपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच घरोघरी जाऊन जनजागृती कार्यक्रमही घेण्यात आला आहे. दोन महिन्यांत येथे डेंग्यूचे 200 रुग्ण आढळले. चेन्नईमध्ये दरवषी जुलैपासून डेंग्यू साथ सुरू होते आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ती लक्षणीय वाढते. अशीच परिस्थिती दिसत आहे.
कर्नाटकात फवारणीवर भर
कर्नाटकातही डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. हे पाहता काही भागात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी मोठय़ा प्रमाणावर फॉगिंग तथा धूर आणि औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना चिकनगुनिया, डेंग्यू आणि व्हायरल फिव्हरबाबतही सावधानता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लक्षणांतील साधर्म्यामुळे गोंधळ
कोरोनाची साथ उतरणीला लागलेली असतानाच डेंग्यूने डोके वर काढले आहे. डेंग्यूची लक्षणे ही कोरोनासारखीच असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. स्वाभाविकच नेमके निदान होण्यास विलंब होत असल्याने बाधितांमध्ये भीतीचे प्रमाण वाढत आहे. सतत बदलणाऱया कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटमुळे जगभरातील आरोग्य तज्ञांसमोर नवे आव्हान उभे राहिलेले असताना डेंग्यूच्या विषाणूतही बदल दिसून येत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
वेळीच काळजी घेण्याची गरज

महाराष्ट्रासारख्या राज्यात आत्तापर्यंत डीईएनव्ही 1 नावाचा व्हेरियंट सापडायचा. यात ताप येणे, हातापायाची हाडे दुखणे आणि डोळय़ांच्या मागे डोके दुखणे अशा पद्धतीची लक्षणे असत. परंतु या वषी डी-1 बरोबर डी-2 चे देखील विषाणू सापडले आहेत. यात लक्षणे तीच असली, तरी प्लेटलेट्सचे प्रमाण खूप वेगाने कमी होते. माणसाच्या शरीरात प्लेटलेट्सचे प्रमाण जे दीड लाखाच्या पुढे असते, ते दुर्लक्ष केल्यास या डी-2 विषाणूमुळे 10 हजारापर्यंत खाली येण्याची भीती असते. यामुळे रुग्णाच्या शरीरात रक्तस्त्राव होण्यासह रुग्णाचे मूत्रपिंड तसेच यकृतावरदेखील परिणाम होण्याचा धोका असतो. म्हणूनच वेळेवर काळजी घ्यायला हवी. थंडी, ताप, हातपाय दुखण्यासारखी लक्षणे असल्यास तात्काळ तपासणी करणे आवश्यक ठरते.
लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता
डेंग्यूचा ताप पाच ते सहा दिवसात गेला नाही, तर हा आजार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सध्या दहा ते पंधरा वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये डेंग्यू काहीसे गंभीर रुप घेत आहे. मुख्य म्हणजे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये नेहमीपेक्षा वेगळी लक्षणे जाणवत आहेत. म्हणूनच लहान मुलांची विशेष काळजी घेणे, त्यांना डासांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.
योग्य आहार हवा
डेंग्यूच्या रुग्णांनी योग्य आहार घेतला पाहिजे. योग्य प्रमाणात पौष्टिक आहार घेतल्यास रुग्ण झपाटय़ाने रिकव्हर होतो. त्याचा डेंग्यू बरा होतो. पपईचा रस, नारळ पाणी, डाळिंबाचा रस यासह पौष्टिक आहार घेतला पाहिजे.
डेंग्यूवरील लस दृष्टिपथात
सॅनोफी पाश्चर या कंपनीने डेंग्यूवर लस तयार केली असून, थायलंडमध्ये चार हजार मुलांवर या लसीची यशस्वी चाचणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीने 70 टक्क्मयांहून जास्त यशस्वीतेचा दावा केला असला, तरी संशोधन संस्थांनी या लसीची कामगिरी 30 टक्के यशाची आहे, असे म्हटले आहे. ही लस बनवण्यासाठी फ्रान्समध्ये 45 कोटी डॉलरचा प्रकल्प उभा राहत असून दरवषी त्यांना एक अब्ज डॉलरची विक्री अपेक्षित आहे. या लशीच्या प्रयोगाचे लॅन्सेट नियतकालिकात डॉ. नादिया टॉर्नीपोर्थ यांनी स्वागत केले आहे. या लसीमुळे डेन-2 विषाणूपासून संरक्षण मिळत नाही, असे म्हटले जाते. जिवंत विषाणूंपासून ही लस बनवली असून तिचे दुष्परिणाम नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. टेट्राव्हॅलन्ट प्रकारातील ही लस असून ती चारही प्रकारच्या डेंग्यू विषाणूंवर परिणामकारक असल्याचा दावाही काही अभ्यासकांनी केला आहे.
मलेरियाचे भय दूर होण्याचे संकेत
पावसाळय़ात डेंग्यूबरोबरच मलेरिया, चिकुनगुनियाही आपले उपद्रवमूल्य दाखवित असतात. मच्छर चावल्याने होणाऱया मलेरियासारख्या आजारामुळे जगभरात दरवषी चार लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडतात. मात्र, त्यावर नियंत्रण मिळवता येणे शक्मय होणार आहे. कारण आता जागतिक आरोग्य संघटनेने या आजारावरील जगातील पहिल्या लसीला मान्यता दिली आहे. आरटीएस,एस/एएस01 (RTS,S/AS01) नामक ही लस लहान मुलांसाठी असणार आहे. या लसीमुळे गरीब देशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या लसीच्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये ती सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या लसीचा आता अतिदुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो. या लसीला मान्यता दिल्याची घोषणा करताना टेड्रोस घेब्रेसेस म्हणाले, आपल्या सर्वांसाठी हा क्षण मैलाचा दगड आहे. या आजारवर अद्याप दुसरी कुठलीही लस उपलब्ध नाही. या आजाराने सन 2019मध्ये सुमारे 4 लाख लोकांचा जीव घेतला आहे. सहारन अफ्रिकेत हा मृत्यूदर डब्ल्यूएचओच्या लस सल्लागारांनी यापूर्वी लस वापरण्याची शिफारस प्रायोगिक तत्त्वावर केली होती. हा कार्यक्रम 2019 मध्ये सुरू झाला असून, घाना, केनिया आणि मलावीने या लसीचा वापर सुरू केला आहे.
भारतात दरवर्षी 3 लाख रुग्ण
पाच वर्षांखालील मुलांना मलेरियाचा सर्वाधिक धोका असतो. दर दोन मिनिटांनी मलेरियामुळे एका मुलाचा मृत्यू होतो. 2019 मध्ये जगभरात मलेरियामुळे 4.09 लाख मृत्यू झाले, त्यापैकी 67 टक्के म्हणजेच 2.74 लाख जण 5 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. भारतात 2019 मध्ये मलेरियाची 3 लाख 38 हजार 494 प्रकरणे होती आणि 77 लोकांचा मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षात भारतात 2015 मध्ये मलेरियामुळे सर्वाधिक 384 मृत्यू झाले. त्यानंतर मृतांची संख्या सातत्याने कमी होत आहे.
पुढचे काही दिवस महत्त्वाचे
मान्सूनचा हंगाम संपला असला, तरी आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागांत परतीचा पाऊस जोरदार होत असतो. या भागात पाणी साचून डासांच्या उत्पत्तीतून डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे पाहता पुढचे काही दिवस महत्त्वाचे असतील. महाराष्ट्रासारख्या राज्यांत अनेकदा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत डेंग्यूचे रुग्ण आढळत असतात. त्यामुळे आणखी काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे, पाण्याच्या टाक्या, कुंडय़ा, फुलदाण्या वेळोवेळी स्वच्छ करणे तसेच वेळोवेळी फवारणी करणे, या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
काय घ्यावी काळजी…
पिण्याचे पाणी जास्त दिवस साठवून ठेऊ नका
फुलदाण्या, कुंडय़ा, टाक्या वेळोवेळी स्वच्छ करा
डास पैदास केंद्रे नष्ट करा, परिसर स्वच्छ ठेवा
मच्छरना अटकाव करण्यासाठी फवारणी करा
सरकारच्या आरोग्यविषयक सूचना पाळाव्यात
थंडी, ताप, अंगदुखीवर वेळीच उपचार घ्यावेत
– सुकृत मोकाशी, पुणे








