प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनानंतर आता डेंग्यूने डोके वर काढले आहे. हलगा येथील मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने जनजागृती तसेच स्वच्छता मोहीम राबविल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी शिवानंद मास्तीहोळी यांनी दिले.
हलगा येथील हर्षदा भीमराव संताजी या मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे बेळगाव तालुक्मयासह शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागही खडबडून जागा झाला आहे. या पार्श्वभूमीवर हलगा, बागेवाडी, काकती या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत जनजागृती करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
डेंग्यू हा ईडीस या डासापासून होतो. हा डास साठवलेल्या स्वच्छ पाण्यातून निर्माण होतो. तो दिवसा दंश करतो. त्यामुळे डेंग्युसारखा आजार उद्भवू शकतो. तेव्हा पाणी अधिक दिवस साठवू नये. दररोज लागेल तेवढाच पाणी साठा करावा आणि त्याचा वापर करावा. घर तसेच परिसर स्वच्छ ठेवावे. पाणी साठवू नये, यासाठी ग्राम पंचायतीने जनजागृती करावी, याबाबत सूचना करण्यात आली आहे.
साठवलेले पाणी तसेच साचून राहिलेले पाणी निचरा होण्याबाबत प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी दक्षता घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे डासांचा प्रतिबंध करण्यासाठी औषध फवारणी करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. हा रोग डासांपासून होत असल्यामुळे रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहनही तालुका आरोग्याधिकारी मास्तीहोळी यांनी केले आहे.
अनगोळमध्येही स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे
अनगोळ परिसरातही डेंग्यूचे रुग्ण वाढल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत महापालिका अजूनही गांभीर्य घेत नसल्याचे दिसून येत आहे. अनगोळमध्ये असलेल्या तलावांमध्ये जलपर्णी वाढली आहे. याचबरोबर काही ठिकाणी डेनेजचे पाणीही रस्त्यावरूनच वाहत आहे. त्यामुळे अधिक धोका आहे. तेव्हा महापालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
अनगोळ येथील तलावांची स्वच्छता करणे महत्त्वाचे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा तातडीने तलावातील जलपर्णी काढून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी अनगोळ परिसरातील नागरिकांतून होत आहे.
डेंग्युमुळे एकही दगावला नाही- डॉ. एम. एस. पल्लेद
डेंग्यूची लागण झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. डेंग्यूने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे, हे यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, जिल्हा रोग नियंत्रण अधिकारी डॉ. एम. एस. पल्लेद यांनी आतापर्यंत डेंग्यूने एकही मृत्यू झाला नाही, असे सांगितले. यामुळे नेमका हा प्रकार काय आहे? हे आता जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनीही या प्रकाराकडे लक्ष देऊन आरोग्य विभागाकडे स्पष्टीकरण मागावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
आकडा लपविण्यासाठी सुरू धडपड
डेंग्यू तसेच इतर साथीच्या आजारांमुळे अनेक जण त्रस्त झाले आहेत. त्याबाबत आरोग्य विभागाने खबरदारी घेणे गरजेचे होते. पावसाळय़ापूर्वीच याचे नियोजन असणे गरजेचे होते. मात्र, कोरोनाच्या विळख्यात इतर साथींच्या आजाराबाबत साऱयांचेच दुर्लक्ष झाले. मात्र, कोरोना काळात डेंग्युनेही अनेकांचा मृत्यू होत आहे. असे असताना थेट कुणाचाच मृत्यू झाला नाही असे सांगून मृत्यूचा आकडा लपविण्यासाठी आरोग्य अधिकाऱयांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
‘झिका’बाबतही गांभीर्य घेणे गरजेचे
झिकाची चेकपोस्टवर तपासणी केली जात आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र, खरोखरच याची तपासणी होत आहे का? का हाही आजार बळावल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. डेंग्युपेक्षाही झिका हा भयावह आणि संसर्गजन्य रोग आहे. केरळमध्ये बऱयाच जणांना याची लागण झाली असून तेथूनच या रोगाचा प्रसार झाला आहे. मात्र, याबाबतही आरोग्य विभाग दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहे. यामुळे जिह्याची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.









