50 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाल्याचा दावा
मार्वर सुपरहीरो फिल्म ‘ब्लॅक विडो’ची अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सनने वॉल्ट डिस्ने कंपनीच्या विरोधात खटला दाखल केला आहे. कंपनीने कराराचा भंग केल्याचा दावा तिने केला आहे. लॉस एंजिलिस सुपीरियर कोर्टात दाखल याचिकेत ब्लॅक विडोच्या दुहेरी प्रदर्शनाच्या धोरणाने स्कार्लेटचे उत्पन्न कमी झाल्याचे म्हटले गेले आहे.

चित्रपटगृहातच चित्रपट प्रदर्शित होणार अशी हमी स्कार्लेटला देण्यात आली होती. पण ब्लॅक विडो हा चित्रपट 9 जुलै रोजी चित्रपटगृह आणि डिस्ने प्लसवर एकाचवेळी स्ट्रीमिंग झाला होता. डिस्नेने महामारीदरम्यान काही चित्रपटांसाठी हायब्रिड पॅटर्नची चाचपणी केली, कारण कंपनी स्वतःच्या स्ट्रीमिंग सेवेला चालना देण्याचा प्रयत्न करत होती.
सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री
माझ्या प्रतिनिधींनी याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी डिस्नेशी संपर्क साधला, पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्कार्लेटचे म्हणणे आहे. 2018 आणि 2019 मध्ये फोर्ब्स नियतकालिकाच्या जगातील सर्वाधिक शुल्क आकारणाऱया अभिनेत्रींच्या यादीत स्कार्लेट पहिल्या स्थानावर होती. तिचे जून 2018 ते जून 2019 मधील एकूण उत्पन्न 56 दशलक्ष डॉलर्स होते. स्कार्लेटने मार्वलच्या 9 चित्रपटांमध्ये ब्लॅक विडो ही भूमिका साकारली आहे.









