मुंबईच्या महिलेसोबत घडला प्रकार
प्रतिनिधी/ सातारा
गोरेगाव ते पन्हाळा या प्रवासादरम्यान साताऱयातील शेंद्रे येथील पेट्रोपंपावर यशराज ट्रव्हल्सची बस थांबली. यावेळी तक्रारदार महिला आपल्या मुलाला घेऊन बाथरूममध्ये गेली. तीने ट्रव्हल्सच्या सीटवर बॅग ठेवली होती. या बॅगेत सोन्याचे दागिने होते. हे दागिने अज्ञाताने लंपास केले. ही बाब महिलेच्या लक्षात येताच तीने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबई येथे राहत असलेल्या अश्विनी संतोष चोपदार (वय 30) या गोरेगाव येथून यशराज ट्रव्हल्स बसमधून माहेरी तिरपण (ता. पन्हाळा) येथे निघाल्या होत्या. यावेळी ट्रव्हल्स पेट्रोल भरण्यासाठी साताऱयातील शेंद्रे फाटा येथे थांबली. यामुळे अश्विनी आपल्या मुलाला घेऊन बाथरूममध्ये गेल्या. यावेळी त्यांनी बॅग ट्रव्हल्सच्या सीटवर ठेवल्या होत्या. यांचा फायदा घेत अज्ञाताने बॅग उघडली. या बॅगेत 1 लाख 46 हजार 800 रूपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने होते. ते हातोहात लंपास केले. अश्विनी या परत बसमध्ये आल्या. तेव्हा त्यांनी बॅग उघडी दिसली. त्यांनी बॅग तपासली तेव्हा दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी इतर प्रवाशांना विचारणा केली परंतु कोणालाही काही माहिती नव्हते. यामुळे त्या तालुका पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांनी घडलेला प्रकार सांगून अज्ञाताविरूद्ध तक्रार दिली. अधिक तपास पोलीस नाईक महांगडे करत आहेत.








