पोस्ट खात्यातील अनागोंदीपणा उघड : कानपूरच्या मुख्य टपाल कार्यालयातील प्रकार
कानपूर / वृत्तसंस्था
भारतीय टपाल विभागाने ‘माय स्टँप’ योजनेच्या अंतर्गत छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेली टपाल तिकिटे छापल्यामुळे खळबळ उडाली आहे.. केवळ पाच रुपयाचे मूल्य असलेली छोटा राजनची 12, तर मुन्ना बजरंगीची 12 तिकिटे छापण्यात आली आहेत. टपाल विभागाला या तिकिटांमुळे 600 रुपयांचे शुल्क मिळाले असले तरी केंद्र सरकारच्या ‘माय स्टँप’ योजनेमुळे टपाल खातेच टीकेचे धनी ठरले आहे. तिकिटे छापण्यापूर्वी फोटोंची पडताळणी न झाल्यामुळे या योजनेतील अनागोंदीपणा उघड झाला आहे. कानपूरच्या मुख्य टपाल कार्यालयात सदर प्रकार घडला आहे.
2017 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या ‘माय स्टँप’ योजनेच्या माध्यमातून एखादी भारतीय व्यक्ती 300 रुपये शुल्क भरून स्वत:चा किंवा स्वत:च्या कुटुंबीयांचा फोटो टपाल तिकिटावर छापून घेऊ शकते. शुल्क जमा केल्यावर भारत टपाल विभाग 12 तिकिटे जारी करत असते. ही तिकिटे इतर टपाल तिकिटांप्रमाणेच असतात. त्यांचा वापर करून तुम्ही देशात कोणालाही पत्रे पाठवू शकता. मात्र, कानपूर टपाल कार्यालयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि गँगस्टर मुन्ना बजरंगी यांची तिकिटे जारी केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. याप्रकरणी, संबंधित अधिकाऱयांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
टपाल विभागाच्या ‘माय स्टँप’ योजनेंतर्गत पाच रुपयांची 12 तिकिटे छापण्यात आली आहेत. यामधील 12 तिकिटांवर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि इतर 12 तिकिटांवर मुन्ना बजरंगीचा फोटो छापण्यात आला आहे. हे तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. याप्रकरणी टपाल कर्मचाऱयांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच या योजनेतील त्रुटीही उघड झाल्या आहेत.
माय स्टॅम्प योजना…
‘माय स्टँप’ योजनेंतर्गत तिकीट छापून घेण्यासाठी अर्जदाराला पासपोर्ट साईज फोटो तसेच संपूर्ण माहिती द्यावी लागते. मृत व्यक्तीचा फोटो टपाल तिकिटावर छापत नाहीत. जीवंत व्यक्तीचेच तिकीट बनवले जात असल्यामुळे अर्जदाराला टपाल कार्यालयात हजर राहावे लागते. परंतु यापैकी कोणतीही प्रक्रिया टपाल खात्याने पाळली नसल्यामुळे ‘अंडरवर्ल्ड डॉन’ची छायाचित्रे असलेली टपाल तिकिटे जारी झाली आहेत.









