सरपंच स्नेहा गवस यांचे पती : ओल्ड गोवा येथे माड अंगावर कोसळून जागीच मृत्यू
प्रतिनिधी /दोडामार्ग
झरेबांबर येथील संजय अर्जुन गवस (47) यांच्यावर शुक्रवारी ओल्ड गोवा येथे काळाने घाला घातला. सुकलेला एक माड अर्ध्यावरून मोडून थेट डोक्यावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. झरेबांबर सरपंच स्नेहा गवस यांचे ते पती होत. झरेबांबर गावातील प्रत्येक सार्वजनिक उपक्रमांत फक्त दिसणारा नव्हे, तर कृतियुक्त वावरणारा तरुण कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने झरेबांबर गावासह तालुक्यातून हळहळ व्यक्त होत होती.
संजय गवस हे केवळ गावातील सामाजिक कार्यापुरते मर्यादित नव्हते. खास करून कोणतेही सामाजिक काम, क्रिकेट-कबड्डी खेळ, दशावतार व नाटय़ प्रयोग यामध्ये संजय यांची उपस्थिती हमखास दिसायची. दोन-तीन दिवसांपूर्वी झरेबांबर येथे झालेल्या नवयुवकांच्या दशावतार नाटय़प्रयोगात कलाकारांच्या पाठीवर थाप देण्यासाठी ते स्वतः उपस्थित होते.
त्यांच्या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ते मित्राच्या लग्न समारंभासाठी गोव्याला गेले होते. दुपारी मित्रांसोबत भोजनाचा आस्वाद घेऊन ते कार्यरत असलेल्या सिप्ला कंपनीच्या दिशेने दुचाकीने निघाले होते. वाटेत ओल्ड गोवा येथे सुकलेला माड अर्ध्यावरून मोडून पडत त्यांच्या डोक्यावर कोसळला. त्यांना तात्काळ गोव्यात बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
काळाने डाव साधला
संजय यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच अनेकांनी बांबोळी येथे धाव घेतली. ज्यांनी ओल्ड गोवा येथील अपघात घडलेला स्पॉट पाहिला, ते अक्षरशः चक्रावले. अपघाताची माहिती स्थानिकांकडून घेतल्यावर समजले की, अपघातस्थळाच्या 50 मीटर पुढे गवस पोहोचले होते. मात्र नारळ पाणी पिण्यासाठी ते माघारी परतले. नारळ पाणी पिऊन ते पुन्हा जात होते. वाटेत वाळलेल्या स्थितीतील माड केवळ काठीसारखा उभा होता. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची झावळे नव्हती. तरीही तो माड अचानक अर्ध्यावरून मोडून हेल्मेट परिधान केलेल्या गवस यांच्या डोक्यावर कोसळला अन् त्यांचा मृत्यू झाला.
अलिकडेच झरेबांबर प्रीमिअर लीगचे केले होते आयोजन
संजय गवस यांना क्रिकेट व कबड्डी खेळाची फार आवड होती. आपल्या गावातील युवकांना खेळण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांनी गेल्यावर्षी सरपंच चषक, तर यावर्षी अवघ्या काहीच दिवसांपूर्वी झरेबांबर प्रीमिअर लीगचे आयोजन केले होते. गावातील सर्वांना सोबत घेऊन चालणारा तरुण कार्यकर्ता म्हणून संजय यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यामुळे अनेकांना त्यांच्या निधनाची बातमी समजताच अश्रू अनावर झाले अन् गावावर शोककळा पसरली.









