यंदा युसेन बोल्ट सहभागी होणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर बोल्ट पर्वानंतर पहिला विजेता कोण असेल, याची उत्सुकता होती. ती रविवारी झालेल्या इव्हेंटमध्ये पूर्ण झाली. मात्र, यात इटलीच्या लॅमोन्ट मार्सेल जेकब्जने सुवर्ण जिंकणे, अवघ्या क्रीडा विश्वाला स्तंभित करुन टाकणारे ठरले. याचवेळी उंच उडीत जियानमार्को तॅम्बेरीने सुवर्ण जिंकल्याने इटलीसाठी ही डबल गोल्ड नाईट ठरली.
2017 मध्ये बोल्ट निवृत्त झाल्यानंतर 100 मीटर्सच्या इव्हेंटमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती लवकर भरुन निघणार देखील नाही. मात्र, बोल्ट नसल्याने अन्य प्रतिस्पर्ध्यात जगभरातील सर्वात वेगवान महामानव बनण्याची संधी निर्माण झाली आणि यामुळे यंदाच्या स्पर्धेकडे विशेष लक्ष होते. लॅमोन्टने 9.80 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली.
इटलीच्या जेकब्जने ही नामी संधी साधण्यात अजिबात कसूर केली नाही. इटालियन जेकब्जने प्रारंभीच मजबूत सुरुवात केली आणि मोमेन्टम कायम राखत अव्वलस्थान काबीज केले. उपांत्य फेरीत त्याने नवा युरोपियन विक्रम देखील नोंदवला होता.
वास्तविक, येथे फायनलमध्ये धडक मारली, त्यावेळी जेकब्ज कोणीच नव्हता. पण, फायनल जिंकल्यानंतर तो जगातील सर्वात वेगवान महामानव ठरला. आश्चर्य म्हणजे येथे ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्यापूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 100 मीटर्सची एकही महत्त्वाची स्पर्धा जिंकलेली नव्हती.
या इव्हेंटमध्ये रविवारी पहिल्या 70 मीटर्सपर्यंत सर्व प्रतिस्पर्ध्यांचा वेग पाहता, ही रेस कोणीही जिंकू शकेल, असेच चित्र होते आणि त्यानंतर अमेरिकेतील जन्म असलेल्या पण, इटलीत स्थायिक झालेल्या जेकब्जने पाहता पाहता आघाडी घेतली. त्याने 9.80 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. अमेरिकेचा प्रेड केर्ली 9.84 सेकंद वेळेसह रौप्य तर कॅनडाचा आंद्रे डे ग्रासेने 9.89 सेकंद वेळेसह कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली.









