रत्नागिरी/ प्रतिनिधी
जिह्यात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना बाधितांची टक्केवारी 8.60 टक्के इतकी खाली आली आहे. सध्या 60 टक्के ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिह्याचा तिसऱया स्तरात समावेश झाला आहे. जिह्यावर घालण्यात आलेल्या निर्बंधातून शिथिलता देण्यास तत्वतः मान्यता मिळाली आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी बुधवार 23 रोजी घोषित करतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी उपस्थित होते. ते म्हणाले, तिसऱया लाटेला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पहिल्या लाटेत 60 वर्षांवरील, दुसऱया लाटेत तरुण तर तिसऱया लाटेत लहान मुले बाधित होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने रत्नागिरीत 173 बेडची तीन कोविड सेंटर लहान मुलांसाठी तयार करण्यात आली आहेत. लहान मुलांच्या करमणुकीची, शिक्षणाची सर्व व्यवस्था त्यामध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून लाखो रुपये खर्च केले आहेत.
सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरी जिल्हाही तिसऱया स्तरात आला आहे. जिह्याच्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्याबाबत आजच्या बैठकीत तत्वतः मान्यता मिळाली आहे. बुधवारी (ता. 23) जिल्हाधिकारी यावर निर्णय घेतील. मात्र निर्बंध शिथिल केले आणि बाधितांची संख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लादावे लागतील. त्यामुळे नागरिकांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंन्सिग आणि सॅनिटायझरचे काटेकोरपणे पालन करावे.









