प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोना संसर्गाचा धोका वाढतच चालला असून बुधवारी जिल्हय़ात 477 कोरोनाबाधितांची नोंद झाल़ी यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 17 हजार 051 इतकी झाली आह़े तर गेल्या 24 तासात आणखी 13 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक होत चालली असून बुधवारी 107 कोरोनाबाधित तर 3 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. रूग्णवाढीचा वेग असाच राहिल्यास आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान देखील वाढत जाणार आह़े
सापडलेल्या 477 पैकी 189 रुग्ण आरटीपीआर चाचणी केलेले तर 288 रुग्ण ऍन्टीजेन चाचणी केलेले आहेत़ नव्या 477 कोरोनाबाधित सापडल्यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 हजार 051 इतकी झाली आह़े या बाबत जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरटीपीसीआरचे रत्नागिरी तालुक्यात 75, दापोली 09, खेड 39, गुहागर 95, चिपळूण 55, संगमेश्वर 107, मंडणगड 06, लांजा 68 व राजापूर 23 असे रूग्ण आढळून आल़े तर 13 कोरानाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 60 वर्षीय पुरूष, संगमेश्वरमधील 70 वर्षीय पुरूष, 59 वर्षीय पुरूष, 58 वर्षीय पुरूष, लांजात 45 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरूष, गुहागरात 50 वर्षीय महिला, 74 वर्षीय पुरूष, खेडमध्ये 75 वर्षीय महिला, दापोलीत 69 वर्षीय महिला, चिपळुणात 39 वर्षीय पुरूष, 61 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्हय़ात कोरोनाचे 488 बळी गेले आहेत.
संगमेश्वर तालुक्यात तिघांचा मृत्यू
बुधवारी आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या अहवालानुसार संगमेश्वर तालुक्यात तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये आंगवलीचे निवृत्त पोलीस अधिकारी व माभळे आणि कडवई येथील 2 वृध्दांचा समावेश आहे. आंगवलीचे रहिवासी व 6 महिन्यांपूर्वीच देवरुख पोलीस स्थानकातून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झालेले पी. डी. कदम (59) यांचा मृतात समावेश आहे. तसेच माभळे घडशीवाडीतील एक आणि कडवई येथील एका 72 वर्षीय वृद्धाचा मृतात समावेश आहे.
न्यायालयांच्या कामकाज वेळेत बदल
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिह्यातील न्यायालयांच्या कामकाजाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. न्यायालयातील कामकाज दिवसांतील केवळ अडीच तास चालणार असून त्यातही महत्वाची प्रकरणे हाताळली जाणार आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायालयीन कामकाजाची वेळ अडीच तास इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयात होणारी गर्दी आणि त्यातून कोरोना संसर्गासंदर्भात होणारे दुष्परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एकूण रूग्ण -17051
नवे रूग्ण -477
मृत्यू -13
एकूण मृत्यू -488









