प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनापासून बरे होणाऱया रुग्णांची संख्या वाढती आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेवून कोरोनामुक्त झालेल्या बेळगाव, हुक्केरी, गोकाक, कोप्पळ व बागलकोटमधील 22 जणांना सोमवारी घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 247 वर पोहोचली आहे. प्रशासनाला आणखी 294 अहवालांची प्रतीक्षा आहे.
बिम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या 22 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. बेळगाव तालुक्मयातील 12, हुक्केरी तालुक्मयातील 7, गोकाक, कोप्पळ, बागलकोट येथील प्रत्येकी 1, अशा एकूण 22 जणांना सोमवारी घरी पाठविण्यात आले आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 298 आहे. यापैकी आतापर्यंत 247 जण उपचारानंतर बरे झाले असून 58 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. यापैकी 43 जण वयस्क, 15 लहान मुले व तीन गर्भवती महिलांचा समावेश असून 58 पैकी 25 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहे.
दरम्यान सोमवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थबुलेटिनमध्ये शहर व जिल्हय़ातील एकही रुग्णाचा समावेश नव्हता. तर जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार 15 हजार 646 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले असून 1 हजार 63 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत जिल्हय़ातील 14 हजार 350 जणांची स्वॅबतपासणी करण्यात आली आहे. यापैकी 13 हजार 371 जणांचे अहवाल निगेटिव्ह व 298 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांपैकी बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाण चांगले आहे. आतापर्यंत 247 जण कोरोनामुक्त झाले आहेत. प्रशासनाला आणखी 294 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे.









