11 ते 13 जानेवारीपर्यंत राज्यभरात जनसेवक मेळाव्याचे आयोजन
प्रतिनिधी/ बेंगळूर
जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये 11 ते 13 जानेवारीपर्यंत जनसेवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे. या मेळाव्याचा समारोप समारंभ 16 किवा 17 रोजी बेंगळुरात होणार असून यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती भाजप राज्य प्रधान कार्यदर्शी महेश टेंगिनकाई आणि राज्य वक्तार कॅप्टन गणेश कर्णिक यांनी दिली. शिमोगा येथील भाजप राज्य कार्यकारिणीच्या सभेनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अश्वथनारायण यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, मंत्री आर. अशोक, एस. टी. सोमशेखर, खासदार प्रतापसिंह, राज्य उपाध्यक्ष एम. राघवेंद्र, एसटी मोर्चा अध्यक्ष छलवादी नारायणस्वामी यांचे पथक 11 जानेवारीला म्हैसूर, चामराजनगर, 12 रोजी हासन आणि मंडय़ा, 13 रोजी रामनगर आणि बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात मेळावा घेणार आहे. मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय प्रधान कार्यदर्शी सी. टी. रवि, मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी, अरविंद लिंबावळी, राज्य रयत मोर्चा अध्यक्ष ईरण्णा कडाडी यांचे पथक 11 रोजी चिक्कमंगळूर आणि उडुपी, 12 रोजी मडिकेरी आणि मंगळूर, 13 रोजी शिमोगा आणि कारवार जनसेवक मेळावा घेणार आहे.
उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री व्ही. सोमण्णा, रमेश जारकीहोळी, राज्य एसटी मोर्चा अध्यक्ष तिप्पराजू हवालदार, श्रीमती तेजस्विनी अनंतकुमार, राज्य कार्यदर्शी तुळसी मुनिराजू यांचे पथक 11 रोजी बेळगाव आणि चिकोडी, 12 रोजी बागलकोट आणि विजापूर, 13 रोजी गदग आणि धारवाड जिल्हय़ांमध्ये प्रवास करणार आहे. चौथ्या पथकाचे नेतृत्त्व मंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे असून पथकात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री शशिकला जोल्ले, प्रभू चव्हाण, मालिकय्या गुत्तेदार, युवा मोर्चा राज्य अध्यक्ष डॉ. संदिप यांचा समावेश आहे. सदर पथक 11 रोजी बिदर, गुलबर्गा, 12 रोजी यादगिरी आणि रायचूर, 13 रोजी बळ्ळारी आणि कोप्पळ जिल्हय़ांमध्ये मेळावा घेणार आहे.
उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथनारायण यांच्या नेतृत्त्वाखालील आणखी एका पथकात उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री बी. श्रीरामुलू, मंत्री बसवराज बोम्माई, खासदार शोभा करंदलाजे, खासदार शिवकुमार उदासी, महिला मार्चाच्या राज्याध्यक्षा गीता विवेकानंद यांचा समावेश आहे. हे पथक 11 रोजी हावेरी आणि दावणगेरे, 12 रोजी चित्रदुर्ग आणि तुमकूर, 13 रोजी कोलार आणि चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ाचा दौरा करणार आहे.









