पक्षाला सासरे जावयांनी ठेवले घरापुरती मर्यादीत
प्रतिनिधी/ सातारा
एकेकाळी काँग्रेसचा जिल्हा म्हणून ओळख होती. अगदी राज्य आणि देशपातळीवरचे निर्णय साताऱयाच्या काँग्रेस भवनातून घेण्यात आल्याचे आर्वजून सांगितले जाते. परंतु याच काँग्रेस कमिटीचे नुकतेच लोकसहभागातून मेकओव्हर झाले असले तरीही कार्यकर्ते व पदाधिकाऱयांचे मेक ओव्हर अजून झाले नाही. सासरे आणि जावयांनी जिल्हा काँग्रेस त्यांच्यापुरती मर्यादित ठेवली आहे. प्रत्येक तालुक्यात पदाधिकाऱयांच्यात गटतट दिसून येतात. त्यामुळे देश पातळीवरील काँग्रेस प्रमाणे जिल्हा काँग्रेसलाही चिंतन करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
सातारा जिल्हा काँग्रेसमध्ये एकेकाळी भरभराटीचे दिवस होते. मात्र, राष्ट्रवादीची स्थापना 1999 ला झाली तेव्हापासून काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. ती अद्याप कायम आहे. यापूर्वीच्या जिल्हाध्यक्षांकडून उर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जिह्यात काँग्रेसचा विस्तार वाढवण्यासाठी जो प्रयत्न व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही. तसेच विद्यमान जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव आणि त्यांचे जावई यांच्यापुरतीच मर्यादीत अशी काँग्रेस आहे अशीच समिकरण सध्या जिह्यात सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.
काँग्रेस भवनाचा मेकओव्हर झाला पण कार्यकर्त्यांचा कधी
एकेकाळी काँग्रेससाठी स्वतःची निष्ठा म्हणून निवडणूक लढवली. निवडणूक लढवताना किती त्रास सहन करावा लागला. त्या त्रासाचे फळ म्हणून काँग्रेसने महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काही काळ काम केलेल्या रजनी पवार यांना थेट सातारा शहराध्यक्ष म्हणून केले आहे. वास्तविक वरच्या पदावर जाण्याऐवजी खालच्या पदावर पाठवल्याने कार्यकर्त्यांचा मेकओव्हर होणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काँग्रेस कमिटीबाहेरच आंदोलने
पक्षाचे कार्यालय म्हणजे त्या पक्षाचे घर असते. घराच्या दारात काँग्रेस पक्षाची आतापर्यंतची आंदोलने झाली आहेत. निषेध करायचा म्हणल तरीही जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एखादे दुसरे आंदोलन केल्याची बाब घडली असावी. या आंदोलनाला मोजकीच मंडळी असतात.
मंत्री आणि वरीष्ठ पदाधिकारी आले की तेवढय़ा पुरती गजबज
मंत्री यशोमती ठाकुर आल्या त्यावेळी जिल्हाध्यक्षांचे जावई यांच्या घरी जाणीवपूर्वक नियोजन केले. त्यामुळे काँग्रेसचा एक गट त्यांच्या घरी गेला नसल्याची त्यावेळी जोरदारपणे सुरु होती. तोच प्रकार प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे आले तेव्हाही झाला. वरीष्ठ पदाधिकारी जेव्हा जिह्यात येतात तेव्हा आपल्या पाठीमागे मोठी गर्दी आहे हे दाखवण्यासाठी तेवढय़ापुरती गजबज उभी केली जाते.
काही पदाधिकारी केवळ प्रसिद्धीलोलुप
काँग्रेसमध्ये काही पदाधिकारी प्रसिद्धी लोलूप असल्याचे कित्येकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले आहे. काम कमी अन् गवगवा जास्त असाच प्रकार यांच्याकडून असतो. त्यामध्ये काँग्रेसची जी शिकवण आहे ती मात्र नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना ज्ञात नसावी, लाकूड हातभर आणि ढपली मणभर असाच प्रकार यांच्याकडून सुरु असतो.
काँग्रेसच्या कुचखावू धोरणामुळे जिल्हा बँकेत एकही जागा नाही
1999 पूर्वी काँग्रेसने बेरजेचे गणित केले होते. परंतु सध्याची काँग्रेस ही सोयीचे पहाते. गेल्या काही महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेची निवडणूक झाली. त्या निवडणूकीत माजी सहकारमंत्री स्व. विलासकाकांचे सुपूत्र यांनी उडी घेतली होती. त्यांना निवडून आणण्यासाठी जी ताकद द्यायला हवी होती. ती दिली गेली नाही. तसेच काही पदाधिकाऱयांनी तर सेटलमेंटसाठी उमेदवारी भरली अन् अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काही उमेदवारांना रखवालीत ठेवून आपले काम झाले की अर्ज मागे घेवून त्यांना सोडून दिले. त्यामुळे जिल्हा बँकेत एकही जागा काँग्रेसला मिळू शकली नाही, असेही सांगण्यात येत आहे.
आत्मचिंतनाची गरज
देशात काँग्रेसला जशी उतरती कळा लागल्याने काँग्रेसच्यावतीने देश पातळीवर आत्मचिंतन करण्यात आले. तसेच आत्मचितन सातारा जिह्याच्यावतीने होण्याची गरज आहे. केवळ गोडगोड भाषणे करणारे आणि लोकांनी भुलवणारे कार्यकर्ते पक्षवाढीकरता गरजेचे नसतात तर गरजेचे असता ते पक्षासाठी निष्ठा ठेवून काम करणारे. त्या कार्यकर्त्यांची काँग्रेसमध्ये उणीव असून जिल्हा काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे.








