उर्वरित एकाही इव्हेंटमध्ये भाग घेणार नाही, मानसिक स्वास्थ जपण्यासाठी निर्णय,
अमेरिकेची सुपरस्टार जिम्नॅस्ट सिमोन बाईल्स हिला यंदाच्या ऑलिम्पिकमधून पूर्ण माघार घ्यावी लागली. मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे तिने गुरुवारी जाहीर केले.
24 वर्षीय जिम्नॅस्ट बाईल्स ही यंदा उर्वरित कोणत्याही इव्हेंटमध्ये सहभागी होऊ इच्छित नाही, असे अमेरिकन जिम्नॅस्टिक्स संघटनेने एका पत्रकातून नमूद केले. बुधवारी एका इव्हेंटमध्ये आपला टर्न आला, त्यावेळी बाईल्सने आपण मानसिकदृष्टय़ा तयार नसल्याने ऑलराऊंड फायनल्समध्ये उतरु इच्छित नसल्याचे म्हटले आणि जेड कॅरेला तिच्या जागी घेण्यात आले.
जेड कॅरे ही क्वॉलिफाईंगमध्ये नवव्या स्थानी आलेली जिम्नॅस्ट आता उर्वरित इव्हेंट्समध्ये बाईल्सची जागा घेईल. कॅरे यापूर्वी बाईल्स व सुनिसा ली यांच्यानंतर तिसरी मानांकित असल्याने ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरु शकली नव्हती. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनच्या नियमानुसार, प्रत्येक देशाला फायनल इव्हेंटसाठी दोन ऍथलिट निवडता येतात.
पुढील आठवडय़ात वैयक्तिक गटातील इव्हेंट्स होणार असून तोवर बाईल्सशी आपण सातत्याने संपर्कात राहणार असल्याचे अमेरिकन संघटनेने यावेळी नमूद केले. बाईल्स हिने ऍपॅरॅटसच्या चारही प्रकारात फायनलमधील आपले स्थान निश्चित केले. अशी कामगिरी तिला रिओ 2016 ऑलिम्पिकमध्ये 5 पदके जिंकताना देखील करता आली नव्हती.
24 वर्षीय बाईल्स ही यंदा टोकियोत पोहोचली, त्यावेळी या आवृत्तीतील कामगिरीसह ती मायकल फेल्प्स व युसेन बोल्ट यांच्यासारख्या दिग्गजांच्या मांदियाळीत दाखल होईल, असेच मानले जात होते. रविवारी व्हॉल्ट, फ्लोअर व बीममधील क्वॉलिफाईंगमध्ये ती झगडत का होईना अव्वलस्थानी पोहोचली. मात्र, सोमवारी तिने सोशल मीडियावर व्यक्त होताना दडपणाचे सर्व ओझे आपल्याच खांद्यावर असल्यासारखे भासत असल्याचे तिने म्हटले होते. व्हॉल्टच्या फायनलमध्ये याची सर्वप्रथम प्रचिती आली. मिड-एअरमध्ये तिचा समतोल ढळला आणि जिथे अडीच ट्वीस्ट पूर्ण करणे आवश्यक होते, तेथे तिला दीड ट्वीस्टवर समाधान मानावे लागले. फिल्ड ऑफ प्ले सोडताना तिने अमेरिकन संघातील डॉक्टर मार्सिया फॉस्टिन यांच्याशी देखील चर्चा केली.
पुढे अमेरिकेने रौप्य जिंकल्यानंतर तिने सुनिसा ली, ग्रेस मॅकालम, जॉर्डन चाईल्स यांना आलिंगन देत विजयाचा आनंद साजरा केला. आता बाईल्सने उर्वरित सर्व इव्हेंटमधून माघार घेतली असल्याने अन्य प्रतिस्पर्ध्यात सुवर्णपदक जिंकण्यासाठी बरीच चुरस असणार आहे. यापूर्वी बाईल्स हिचे जेतेपद गृहितच धरले गेले होते. आता मात्र तीच फायनलमध्ये नसल्याने अन्य प्रतिस्पर्ध्यांसाठी ही नामी संधी मानली जाते. क्वॉलिफाईंगमध्ये ब्राझीलची रेबेका आंद्रेद ही दुसरी आली होती. त्यानंतर ली आणि रशियन्स अँजेलिना मेल्निकोव्हा व व्लादिस्लॅव्हा यांनी अनुक्रमे स्थान संपादन केले होते. या तिघींमध्ये आता चुरस रंगू शकते.
बाईल्सच्या जागी अमेरिकन संघात समाविष्ट होणारी जेड कॅरेने व्हॉल्टमध्ये दुसरे सर्वोत्तम आणि फ्लोअरवर क्वॉलिफाय होताना तिसरे सर्वोत्तम गुणांकन प्राप्त केले होते. तोच धडाका आता बाईल्सची जागा भरुन काढताना कायम राखण्याचा तिचा प्रयत्न असणार आहे.









