एखादा दिवसच असा येतो की ज्यावेळी काही काही म्हणून सुचत नाही. कारण आपण नेहमीच्या मूडमध्येच नसतो. जर आपण स्वतःला एक जिवंत माणूस म्हणवत असू तर आसपासच्या भीषण परिस्थितीचा परिणाम होऊन सुन्न होणे हे आपल्या बाबतीत घडणारच असते. मुकी जनावरेही माणसांचे दुःख पाहून सैरभैर होतात. मग माणसासारखा माणूस तर वेडापिसा झाल्याशिवाय कसा राहील? खरं तर ही वेळ गाणी आठवत बसण्याची नव्हेच. पंचमहाभूतांपैकी एक ‘आप’ म्हणजे पाणा, जे आज पिशाच्च होऊन अंगावर येते आहे आणि अवस्था तर अशी आहे की
समुद्री चहुकडे पाणी
पिण्याला थेंबही नाही
आणि त्याहून वाईट आहे ते हे की ज्यांनी पालकत्त्व पत्करलेले आहे असे लोक मात्र
जनांच्या कोरडय़ा गप्पा
तसे सारे जगद्बंधु
दमामा गर्जनेचा हो
न नेत्री एकही बिंदू
असे वागताना दिसतात. स्वतः काठावरून, कोरडे राहून, चिखलात पाय न घालता तोच चिखल एकमेकांवर फेकत फेकत बुडालेल्या लोकांना कोरडाच उपदेश करणारे हे कोण ‘जबाबदार’ लोक आहेत त्याविषयी अधिक बोलायची गरजच नाही. पण ज्यावेळी कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ या कवितेतल्या त्या विद्यार्थ्यासारखी अवस्था आज हजारो लाखो लोकांची झालेली आहे तेव्हा काय बोलावे हेच कळेनासे होते. अजूनही पूर येतच आहेत. हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडमध्ये येणाऱया पुराच्या पाण्याचा झपाटा नुसता व्हीडिओमध्ये बघितला तरी थरकाप उडतो.
अरं अरं मानसा तू येडा का खुळा रं
देवापुढं मानुस पालापाचोळा रं
हे शब्द त्यातला प्रकार बघून चांगलेच पटतात. माणसाने वर्षानुवर्षे कष्ट करून इमले उभे करावेत, काडी काडी जमवून संसार उभा करावा आणि निसर्गाच्या एका तडाख्यामुळे सगळेच विस्कटून वाहून निघून जावे हे किती म्हणून भयानक आहे! किती घरातल्या महाग-मोलाच्या वस्तू वाहून गेल्या, किती लोकांची भांडीकुंडी, कपडालत्ता, धान्यधुन्य अक्षरशः धुऊन गेले आणि किती लोकांनी तर आपली माणसंच गमावली! अख्खे कडय़ाळ कोसळले, डोंगर खचले, रस्ते, घाट तडावले आणि पूल खचले. दरडीखाली गाडून संपून गेलेली कितीतरी गावे ‘माळीण’ सारखी नष्टच झाली आहेत. झोपेतच ज्यांचे आयुष्य संपले त्यांना आपला जीव कधी गेला ते तरी कळले असेल का? त्यात किती लहान तान्ही बाळं असतील? बाळंतिणी असतील? किती नवतरुण, तरुणी असतील? शाळकरी पोरं असतील? नातवंडांना जवळ घेऊन स्वप्नात हरवलेले आजी-आजोबा असतील? स्मशाने झाली आहेत गावंच्या गावं! आणि सगळय़ात वाईट अवस्था त्यांची आहे जे लोक या कहारातून बचावले खरे, पण त्यांनी त्यांच्या डोळय़ादेखत त्यांचे कुटुंब गमावले आहे. जिवंत
प्रेत म्हणून वावरत आहेत असे कितीतरी लोक!
सरले रडणे, उरले हसणे
भवती रचितो भलती व्यसने
विझवू बघतो जाळ आतला
असेच झाले असेल त्यांचे. आभाळच फाटले तर टाके तरी कुठे कसे आणि किती घालणार? ‘हा माझा मार्ग एकला’ म्हणत म्हणतच चालावे लागते.
अजून उजाडत नाही म्हणता म्हणता किती ठिकाणी उजाडायचे राहिले आहे म्हणायचे? आणि उजाडायला हवे, विकासाचा उजेड दारातून आत यायला हवा म्हणून आपण माणसे स्वतःला, स्वतःच्या घरादाराला, पर्यावरणाला उजाडच करून सोडणार आहोत का? जिथे उजेड पोहचत नाही तिथे तो मिळावा म्हणून कुणी घरावरचे छप्पर काढून फेकत नसते. तर तेवढय़ा वेळात दिवटय़ा, मशाली पाजळून काम करतात. अगदीच ज्याला अजून प्रकाशाची हौस आहे तो स्वतः उठून घराबाहेर येतो. जगणे खरंच सुंदर आहे आणि ते तितकेच मौल्यवान आहे. त्याची किंमतच कुणी ठेवत नाही. मग बळी पडणारे बळी पडत राहतात आणि ‘बळी’ असणारे लोक कान पिळीत राहतात. त्यांच्या घरावर मजले चढत राहतात. काही गाणी अशीही जन्मली होती ज्यात तत्कालीन राज्यव्यवस्थेचे उपरोधिक भाषेत वर्णन केलेले होते, पण ती घाणेरडी कुजकी वृत्ती कधीतरी सुधारेल, काहीतरी चांगले घडेल या आशेपायी होती.
अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी,
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे
हे गाणे लिहिताना त्या माणसाची हे चित्र कायम रहावे अशी इच्छा थोडीच होती? उलट त्या वाईट परिस्थितीमुळे हताश होऊन काढलेला हा उद्गार आहे. ही अशीच परिस्थिती म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी परिस्थिती जर आजही असेल तर ही आणि अशी सगळी गाणी म्हणजे ती करणाऱयांना आपले अपयशच वाटेल.
प्रत्येक व्यक्तीचे आपले स्वतःचे असे एक स्वतंत्र जग असते. त्यात त्याच्या घरटय़ात त्याची माणसे असतात. भोवताली शेजारी पाजारी, मित्रमंडळी असतात. माणसाशी जोडलेल्या माणसांच्या अनेक साखळय़ांनी हा समाज घडत असतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा माणसे अशी एकाएकी निसर्गाच्या कोपाला बळी पडतात किंवा मोडतात तेव्हा समाजावर एकूणच फार वाईट परिणाम होत असतो. घराबाहेर पडणारी माणसे सावित्रीने गिळली तेव्हा, तामिळनाडूच्या किनारपट्टीवर त्सुनामीने गावेच्या गावे एकाच फटकाऱयात उडवून दिली तेव्हा, केदारनाथला प्रलय झाला तेव्हाही आणि माळीण किंवा आताचे तळा, चिपळूण प्रकरण घडले तेव्हाही असंख्य वर्तुळे बुडबुडय़ासारखी धडाधड फुटत चालली आहेत. आपण सगळे काय गमावतो आहोत, त्याचे दूरगामी परिणाम काय आहेत हे आपल्याला कालांतराने कळत जाते. पण हे जे आत्ता घडते आहे, तेही भीषण आहे. ते बघवत नाही. सगळा संसार वाहून गेला आहे आणि घरात फक्त गाणे आणि चिखल उरला आहे त्यात गळाभर बुडून माणसे गमावली आहेत आणि जगायला प्रयोजन राहिले आहे की नाही असा प्रश्न पडणाऱया माणसाला आक्रोश करून देवाला हाच प्रश्न विचारावासा वाटत असेल,
दयाघना,
का तुटले चिमणे घरटे
उरलो बंदी असा मी
दयाघना…
ऍड. अपर्णा परांजपे-प्रभु – 8208606579








