‘कोरोना’ या शब्दातील तीन अक्षरे किंवा ‘कोविड-19’ मधील तीन अक्षरे आणि दोन अंक या एकाच हाताच्या बोटांवर मोजता येणाऱया चमत्कारिक रोगाच्या नावाने जगभर इतका धुमाकूळ घातला आहे की सांगता सोय नाही. बघता बघता कोणालाही होऊ शकणारा संसर्ग आणि त्या भीतीने ठप्प झालेल्या सर्व तऱहेच्या व्यवहारांमुळे दिवसागणिक होणारे अब्जावधी रुपयांचे नुकसान हे ‘कोविड-19’चे भयानक दृश्य परिणाम आहेत. त्या सहज दिसणाऱया परिणामांच्या पलीकडे खूप काही बदलून टाकणारा हा विचित्र आजार! प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्याने मानवी जीवनाचीच नव्हे तर प्राणी जीवनाचीही विविध क्षेत्रे नासून टाकली.
अशा क्षेत्रांमध्ये पर्यटन व प्रवास हे एक महत्त्वाचे. ‘कोरोना’जन्य लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांमध्ये हे पहिल्या पाचांत यावे. जागतिक पातळीवर होणाऱया सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) एक दशांश वाटा हे क्षेत्र उचलते. मोटारनिर्मिती उद्योगाच्या जवळ जाणारा हा आकडा आहे. जगात होणाऱया एकूण शेती उत्पादनाच्या मूल्यांपेक्षा पर्यटन आणि प्रवासातून निर्माण होणारा पैसा जास्त आहे. अर्थात रोजगार निर्मितीमध्ये देखील हे क्षेत्र मागे असण्याचे कारण नाही. 2019 मध्ये म्हणजे गेल्यावर्षी जगभरात पर्यटन व प्रवास क्षेत्रात तब्बल एक चतुर्थांश म्हणजे 25 टक्के रोजगार संधी निर्माण झाल्या. असे हे क्षेत्र अचेतन होऊन ‘कोरोना’ची साथ कधी संपते, याकडे डोळे लावून बसले आहे.
‘पर्यटना’चेही कित्येक प्रकार आता अस्तित्वात आले आहेत. जुनी पुराणी मंदिरे, धबधबे, समुद्रकिनारे आणि बर्फाळ पर्वत यात अडकलेले पर्यटन गेल्या पंधरा-वीस वर्षात अन्य कित्येक क्षेत्रांचा महत्त्वाचा आर्थिक स्रोत होऊन बसले. जसे कृषी पर्यटन, आरोग्य पर्यटन इ. ‘वन्यजीव पर्यटन’ हा असाच एक प्रकार. ज्यामध्ये जंगलात राहणारे प्राणी पाळणे, पाळलेल्या जंगली प्राण्यांच्या पाठीवरून हिंडणे, त्यांच्यासोबत फोटो काढणे, गर्द झाडीत लपलेल्या सुंदर सुंदर पक्ष्यांचे दुर्बिणीतून निरीक्षण करणे वगैरे बऱयाच गोष्टी मोडतात आणि त्यातून खूप मोठे अर्थचक्र समर्थपणे चालत राहते.
ही आर्थिक उलाढाल किती मोठी आहे, याचा अंदाज येण्यासाठी एक छोटेसे उदाहरण सांगता येईल. नामिबिया हा दक्षिण आफ्रिका खंडातील पश्चिम किनाऱयावरचा देश. सव्वा आठ लाख किलोमीटरचे त्याचे क्षेत्र कर्कवृत्ताच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना सारखेच पसरले आहे. भारतीय क्षेत्रफळाच्या एक चतुर्थांशपेक्षा किंचित जास्त क्षेत्र असणाऱया या देशाचा मुख्य आधार आहे तो वन्यजीव पर्यटन. नामिबियातील ‘वन्यजीव पर्यटन’ म्हणजे प्रामुख्याने हत्तींच्या पाठींवर बसून दीड दोन पुरुष उंच गवतात भटकंती करणे, तास न् तास चिखलात बसलेले गेंडे आणि डरकाळ्या फोडून जंगल दणाणून सोडणारे सिंह पाहणे. नामिबियातील ‘वन्यजीव पर्यटना’ची ही मुख्य रूपे. पण वरवर किरकोळ वाटणाऱया या कामातून नामिबियाने 2018 साली 34 हजार 660 कोटी रुपये (346.6 बिलयन डॉलर) एवढे उत्पन्न मिळवले. ही रक्कम जागतिक जीडीपीच्या 0.4 टक्के एवढी होती. या काळात जगात निर्माण झालेल्या एकूण रोजगाराच्या 36 टक्के रोजगार आफ्रिका खंडात आणि त्यातला 15.4 टक्के एकटय़ा नामिबियात झाला, तर 14.7 टक्के हे जीडीपीचे प्रमाण होते.
किती प्रचंड नुकसान
ही आकडेवारी पाहिली की, हे सगळे ‘कोविड’पोटी बंद पडल्यामुळे किती प्रचंड नुकसान झाले असेल हे ध्यानात येते. संपूर्ण जगातील पर्यटन व्यवसायाचे 2.1 ट्रिलियन डॉलर एवढे नुकसान झाले. ही संख्या नेमकी केवढी आहे, त्याचा अंदाज बांधूया. ‘कोविड-19’ आणि
‘लॉकडाऊन’मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटातून डोके वर काढण्यासाठी आपल्या देशात मोठा गाजावाजा करून जे ‘वीस लाख कोटी’ रुपयांचे
पॅकेज घोषित करण्यात आले, त्याच्या किमान सत्तर पट एवढी प्रचंड ही रक्कम होईल.
नामिबियातील ‘वन्यजीव पर्यटना’मध्ये हत्ती हे आर्थिक उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन आहे. अशाच प्रकारे आफ्रिकेतील अन्य काही देशांमध्येही हत्तींचा वापर होतो. आशिया खंडात किमान 3 हजार तरी हत्ती ‘वन्यजीव पर्यटना’च्या क्षेत्रात वापरले जातात. थायलंड, श्रीलंका, नेपाळ, भारत, लाओस आणि कंबोडिया हे देश यात पुढे आहेत. ‘जागतिक प्राणी सुरक्षा’ या संघटनेच्या मते या सहा देशात 2,923 हत्ती सध्या या क्षेत्रात आहेत आणि थायलंड जितके हत्ती वापरतो, त्यांच्या फक्त निम्मे उरलेल्या पाच देशात सगळे मिळून वापरले जातात.
थायलंडमध्ये 2010 ते 2016 या सहा वर्षांत पर्यटकांची संख्या दीड कोटींवरून सव्वातीन कोटींवर गेली. त्या प्रमाणात उत्पन्नही वाढले. मात्र एवढे प्रचंड उत्पन्न मिळवून देणाऱया गजराजांची परिस्थिती अत्यंत वाई&ट असते. त्यांना जेमतेम दहा फूट लांबीच्या साखळदंडांनी ठाणबंद करून ठेवतात. फरशीच्या जमिनीवर ठेवल्याने त्यांना त्रास होतो. आजूबाजूला चालणारा गाण्यांचा, वाहनांच्या आवाजाचा गोंगाट त्यांना असह्य होतो. सदोदित माणसांच्या वावराला ते कंटाळतात.
बहुतेक हत्तींना लहानपणी त्यांच्या आईपासून तोडून आणलेले असते. माणसाळवताना अशास्त्राrय व कठोर पद्धतीने शिकवले जाते. त्यांना पुरेसे खायला दिले जात नाही. नीटशी स्वच्छता ठेवली जात नाही. त्यांच्या धैर्याने खच्चीकरण करून ते सहज आज्ञा ऐकतील, असे वळण लावतात. याखेरीज हस्तिदंतासाठी होणारी शिकार वेगळीच! अत्यंत बुद्धिमान अशा या प्राण्याला दिली जाणारी ही क्रूर वागणूक थांबली पाहिजे. यासाठी प्राणीमित्रांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत.
12 ऑगस्ट रोजी येणारा ‘जागतिक हत्ती दिन’ आणि शेवटच्या आठवडय़ात येणारा गणेशोत्सव यांच्यानिमित्ताने देवतेच्या ठायी असलेल्या या लोभस प्राण्याबरोबर स्नेहपूर्ण वागण्याचा संकल्प सोडूया!
राजेंद्रप्रसाद मसुरकर, 9960245601








