सेन्सेक्समध्ये 295, निफ्टीत 119 अंकांची वाढ ः लार्सन टुब्रो सर्वाधिक नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारांमध्ये सकारात्मक संकेताच्या जोरावर शेअर बाजारात सोमवारी तेजी कायम राहिली. सरतेशेवटी सेन्सेक्सचा निर्देशांक 295 अंकांच्या तेजीसह 49,502 अंकांवर तर निफ्टीचा निर्देशांक 119 अंकांच्या वाढीसह 14,942 अंकांवर बंद झाला. फार्मा, धातू आणि सरकारी क्षेत्रातील बँकांचे समभाग खरेदी करण्यावर गुंतवणूकदारांनी भर दिला होता. वरील तीनही निर्देशांक 2 ते 3 टक्के तेजीत होते.
लसीकरण मोहिमेला मिळणारी गती आणि कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी घट याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसला. सलग चौथ्या दिवशी सोमवारी शेअर बाजार तेजीत होता. सेन्सेक्स एकावेळी 345 अंकांच्या वाढीसह 49,551 अंकावर तर निफ्टी निर्देशांक 119 अंकांच्या वधारासह 14,942 अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्समधील समाविष्ट 30 पैकी 23 समभाग तेजी दर्शवत होते. सन फार्मा व डॉ. रेड्डीज लॅबरोटरीचे समभाग 3-3 टक्के तेजीत होते. अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग मात्र 1 टक्के घसरणीत होते. लार्सन अँड टुब्रोचे समभाग सोमवारी सर्वाधिक 4 टक्के इतके तेजीत होते. बीएसईमधील 2079 समभाग तेजी नोंदवत होते. एक्स्चेंजमधील लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 213.38 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
आज सकाळी सेन्सेक्सचा निर्देशांक 289 अंकांच्या तेजीसह 49,496 वर तर निफ्टी निर्देशांक 105 अंकांच्या तेजीसह 14,298 अंकांवर खुला झाला होता. शुक्रवारी सेन्सेक्स 256 अंकांच्या वाढीसह व निफ्टी 98 अंकांच्या वधारासह बंद झाला होता.
जपानचा निक्केई निर्देशांक 166 अंकांच्या वाढीसह 29,524 वर तर चीनचा शांघाई कम्पोझिट निर्देशांक 9 अंकाच्या किरकोळ वाढीसह 3427 अंकांवर बंद झाला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 33 अंकांनी घसरून 28,594 अंकांवर बंद झाला. कोरियाचा कोस्पी निर्देशांक 52 अंकांच्या वाढीसह 3,249 अंकांवर बंद झाला. शुक्रवारी अमेरिकेतील डाऊजोन्स 229 अंकांच्या वाढीसह तर नॅस्डॅक 119 अंकांच्या वाढीसह 13,752 अंकांवर बंद झाला होता.








