क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
जलतरणपटू यश सावर्डेकरची खेलो इंडिया 2022 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी जलतरण क्रीडाप्रकारात भाग घेण्यासाठी निवड झाली आहे. 17 वर्षांखालील गटात यश सावर्डेकर आपले कसब दाखवेल. सदर स्पर्धा दिल्ली आणि हरियाणात येत्या फेब्रुवारी महिन्यात होईल.
वयाच्या सहाव्या वर्षांपासून यश मडगाव येथे जलतरण प्रशिक्षक इनासियो रापोझा यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरण प्रशिक्षण घेत आहे. गोव्याचे विविध स्पर्धेत त्याने प्रतिनिधीत्व केले असून कित्येक पदकेही मिळविली आहेत. जलतरणप्रमाणे क्रिकेट खेळातही यशने प्राविण्य प्राप्त केले असून गोव्याचे 14 व 16 वर्षांखालील क्रिकेट संघाचेही त्याने प्रतिनिधीत्व केले आहे. या व्यतिरिक्त इंडियन कौन्सिल फॉर चाईल्ड अँड वॅल्फेअरचा शौर्य पुरस्कारही यश सावर्डेकरला मिळाला आहे.









