उत्पादन प्रकल्प उभारण्याच्या तयारीत : चीनमधून लवकरच पडणार बाहेर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
कोविड19 च्या वाढत्या संसर्गामुळे जगाची जगण्याची रीत मोठय़ा प्रमाणात बदलत आहे. यातच चीनमधून कोविडचा प्रसार जगभरात झाल्यामुळे चीनवर विविध देशांनी नाराजी व्यक्त करत आपले उद्यागधंदे दुसरीकडे स्थलांतरीत करण्याचे नियोजन केले आहे. दिग्गज कंपन्यांनी यामध्ये भारतात आपला व्यवसाय स्थापन करण्याची तयारी दर्शवली आहे.
याचाच एक भाग म्हणून आता जर्मन फुटवेअर ब्रँड वोन वेल्स यांनी आपल्या उत्पादनांचा प्रकल्प चीनमधून भारतात स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वोन वेल्स कंपनी उत्पादन प्रकल्प देशातील आग्रा येथे उभारणार आहे आणि यासाठी लॅट्रिक इंडस्ट्रीजसोबत कंपनीने करार केला आहे.
वोन वेल्स या बँडची ओळख त्यांच्या आरोग्यदायी फुटवेअर(हेल्दी फुटवेअर)मुळे जगाला झालेली आहे. पाय, गुडघा आणि पाठीच्या वेदना कमी करण्यासाठी यांची मदत होत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
जगभरातील विविध देशात पसंती
जगातील जवळपास 80 देशांमध्ये या ब्रँडची विक्री केली जात असून तब्बल 10 कोटी इतके कंपनीचे ग्राहक असल्याचीही माहिती आहे. या बँडचे सादरीकरण 2019 मध्ये करण्यात आले आहे. जगभरात यांचे 500 किरकोळ स्टोअर्स आहेत. यासोबतच ऑनलाईन विक्रीचीही कंपनीने सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
लावा भारतात येणार
मोबाईल उपकरणांची निर्मिती करणारी कंपनी लावा इंटरनॅशनलने चीनला मोठा झटका दिला आहे. कंपनीने चीनमधील आपला व्यवहार गुंडाळून भारतात येण्याची तयारी केली आहे. तसेच आमचे एक स्वप्न आहे, की भारत आगामी काळात मोबाईलची निर्यात चीनला करणार असून यासाठी आगामी पाच वर्षाच्या कालावधीसाठी 800 कोटी रुपयांची योजना आखण्यात आली असल्याचे सांगण्यात येते.









