कंपनी 6,598.38 कोटींची गुंतवणूक करणार : चार आठवडय़ांत जिओमध्ये चौथा व्यवहार
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील चार आठवडय़ांच्या आत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये जागतिक इक्विटी कंपनी जनरल अटलांटिकने 6,598.38 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक करणारी चौथी कंपनी आहे. या व्यवहारासोबत कंपनी जिओमधील 1.34 टक्क्मयांची हिस्सेदारी ताब्यात घेणार आहे. फेसबुक, सिल्वर लेक, विस्टा आणि आताच्या जनरल अटलांटिक या कंपन्यांच्या व्यवहारामधून रिलायन्सने जवळपास 67,194.75 कोटी रुपयांचा फंड उभारला आहे. या कामगिरीमुळे रिलायन्सला कर्ज कमी करण्यास मोठी मदत मिळणार आहे.
या एकूण व्यवहाराच्या मदतीने जिओ प्लॅटफार्मचे इक्विटी मूल्य 4.91 लाख कोटी रुपये आणि एन्टरप्राईजेस मूल्य 5.16 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आताच्या जनरल अटलांटिकच्या गुंतवणुकीमुळे जिओ प्लॅटफार्म देशातील नव्या उमेदीची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी जिओ इन्फोकॉमकडे वाटचाल करीत आहे.
जनरल अटलांटिकची पार्श्वभूमी
जनरल अटलांटिक ही अमेरिकेतील खासगी जगप्रसिद्ध कंपनी आहे. यांनी फेसबुक व अलीबाबा या सारख्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे. मागील 40 वर्षांपासून टेक्नॉलॉजी, कंझ्युमर, फायानान्शिअल सर्व्हिसेस आणि हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करीत आली आहे. जगभरातील एअरबीएनबी, अलिबाबा, ऍट फायनान्शिअल, बॉक्स, बाइटडांस, फेसबुक, स्लॅक, स्नॅपचॅट, उबर यासारख्या कंपन्यांचाही समावेश आहे.
ध्येयाशी आम्ही सहमत : सीईओ बिल फोर्ड
मुकेश अंबानी यांच्या विचारांशी आम्ही सहमत आहे. यामुळे आगामी काळातील डिजिटल कनेक्टिविटीच्या आधारे देशाच्या अर्थव्यवस्थेला वेगाने बळकटी देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जनरल अटलांटिकचे सीईओ बिल फोर्ड यांनी म्हटले आहे.
समभागधारकांना दिलासा
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आपल्या समभागधारकांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने म्हटले आहे की राइट्स इश्यूमधील समभाग खरेदी करण्यासाठी आता समभागधारकांना तीन टप्प्यात समभाग खरेदीची रक्कम जमा करता येणार आहे. यामध्ये 25 टक्के रक्कम फक्त बुकिंगच्या दरम्यान द्यावी लागणार आहे तर अन्य रक्कम आगामी दोन वर्षात दोन टप्प्यात देण्याची सुविधा देण्यात येणार असल्याचे रिलायन्सने म्हटले आहे. राईट इश्यूची घोषणा करुन समभागधारकांना आकर्षित केले आहे. तसेच सध्याच्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्व आर्थिक चक्र मंदावले असल्यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. 20 मे रोजी 53,125 कोटींचा राइट इश्यू खुला होणार आहे.









