वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
कॅनडाची बिगर मानांकित आणि नवोदित महिला टेनिसपटू लैला फर्नांडिझने येथे सुरू असलेल्या अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरचा पराभव करत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या स्पर्धेत फर्नांडिझने माजी दोन विजेत्या सीडेड टेनिसपटूंना पराभवाचा धक्का देत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. पुरूष विभागात स्पेनच्या 18 वर्षीय कार्लोस ऍल्कॅरॅझने पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना जर्मनीच्या गोझोविजेकचा पराभव केला.
महिला एकेरीच्या झालेल्या सामन्यात कॅनडाच्या फर्नांडिझने केर्बरचा 4-6, 7-6 (7-5), 6-2 असा पराभव करून आपला 19 वा वाढदिवस साजरा केला. या स्पर्धेत 2016 साली केर्बरने विजेतेपद पटकाविले होते. फर्नांडिझने यापूर्वीच्या फेरीतील सामन्यात जपानच्या विद्यमान विजेत्या नाओमी ओसाकाला पराभूत केले होते.
पुरूष एकेरीच्या सामन्यात स्पेनच्या नवोदित 18 वर्षीय कार्लोस ऍल्कॅरॅझने फ्रान्सच्या जर्मनीच्या पीटर गोझोविजेकचा 5-7, 6-1, 5-7, 6-2, 6-0 अशा पाच सेट्समधील लढतीत पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत 1963 नंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविणारा स्पेनचा ऍल्कॅरॅझ हा सर्वांत तरूण टेनिसपटू ठरला आहे. उपांत्यपूर्व फेरीत अल कॅरेझचा सामना कॅनडाच्या 21 वर्षीय फेलिक्स ऍलीसिमेविरुद्ध होणार आहे. अलीसिमेने अमेरिकेच्या टिफोईवर 4-6, 6-2, 7-6 (8-6), 6-4 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. या सामन्यात ऍलीसिमेने 24 बिनतोड सर्व्हिसची नेंद केली. या स्पर्धेत यावेळी नऊ सीडेड खेळाडूंनी दुसऱया आठवडय़ात प्रवेश केला आहे.









