अंतिम लढतीत मँचेस्टर सिटीवर एकमेव गोलने मात, हॅवर्ट्झचा गोल ठरला निर्णायक
वृत्तसंस्था/ पोर्टो, पोर्तुगाल
शनिवारी रात्री येथे झालेल्या अंतिम लढतीत थॉमस टचेल यांच्या चेल्सी संघाने पेप गार्डिओला यांच्या मँचेस्टर सिटी संघाचा एकमेव गोलने पराभव करून नऊ वर्षांच्या खंडानंतर चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावले. एकमेव विजयी गोल कइ हॅवर्ट्झने 42 व्या मिनिटाला नोंदवला.
पाच महिन्यापूर्वी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पॅरिस सेंट जर्मेनने जर्मनीच्या टचेल यांना प्रशिक्षकपदावरून काढून टाकले होते. पण चेल्सीने त्यांना आपल्या ताफ्यात सामील करून घेत संघाची जबाबदारी सोपविली. ते चेल्सीत सामील झाले तेव्हा प्रिमियर लीगमध्ये चेल्सी संघ नवव्या स्थानावर होता. हॅवर्ट्झला चेल्सीने 71 दशलक्ष पौंड्सला लिव्हरकुसेनकडून खरेदी केले होते. त्याच्याकडून उत्तम प्रदर्शन करून घेण्याची जबाबदारी टचेल यांनी परिपूर्णतेने पार पाडली आणि निर्णायक सामन्याच्या मध्यंतरास तीन मिनिटांचा अवधी असताना त्याने एकमेव गोल नोंदवत चेल्सीला जेतेपद मिळवून दिले. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात दोन्ही इंग्लिश संघ खेळण्याची ही तिसरी वेळ होती. टचेल गार्डिओला यांना गुरुसमान मानतात. बार्सिलोनाचे प्रशिक्षक असताना गार्डिओला यांनी चार वर्षांत 14 ट्रॉफीज जिंकल्या होत्या. त्याने प्रेरित होऊन टचेल यांनी जर्मनीत काम करण्यास सुरुवात केली. बोरुसिया डॉर्टमंड व बायर्न म्युनिच संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी संघर्ष सुरू केला होता.
येथील अंतिम सामन्यात 42 व्या मिनिटाला मेसन माऊंटने दिलेल्या थ्रू बॉलवर ताबा घेत हॅवर्ट्झने गोलरक्षक एडर्सन मोरेसला हुलकावणी देत चेंडू रिकाम्या गोलपोस्टमध्ये मारला. हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. ‘याबद्दल काय बोलावे सुचत नाही. पण यासाठी मी खूप प्रतीक्षा केली होती,’ असे हॅवर्ट्झ नंतर म्हणाला. जर्मनीच्याच टचेल यांना यश मिळविण्यास फक्त एका मोसमाची वाट पहावी लागली. ते प्रशिक्षक असताना 2020 मध्ये झालेल्या अंतिम लढतीत त्यांच्या पॅरिस सेंट जर्मेन संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आणि महिन्यानंतर चेल्सीने त्यांना करारबद्ध केले आणि चारच महिन्यात त्यांनी संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. टचेल व गार्डिओला हे जगातील दोन सर्वोत्तम नावीन्याचा ध्यास घेतलेले प्रशिक्षक असल्याचे मानले जाते. त्यांच्यातील डावपेचात्मक जुगलबंदीच या लढतीत दिसून आली. गार्डिओला यांनी सेट झालेल्या सिटी संघात बदल करण्याची चूक केल्याबद्दल त्यांना खेद वाटला असावा. सिटीने पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. याशिवाय या मोसमात तिहेरी मुकुट साधण्याची सिटीची संधीही येथील पराभवाने हुकली. याआधी त्यांनी प्रिमियर लीग व इंग्लिश लीग चषक स्पर्धा जिंकली आहे.
यापूर्वी 2012 मध्ये चेल्सीने या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकणारे टचेल हे तिसरे जर्मन प्रशिक्षक आहेत. याआधी लिव्हरपूलच्या जुर्गेन क्लॉप यांनी 2019 मध्ये आणि गेल्या मोसमात बायर्न म्युनिचच्या हॅन्सी फ्लिक यांनी असे यश मिळविले होते.









