भूसेना प्रमुख नरवणे यांचे प्रतिपादन, सीमेवर सैनिक दक्ष, सज्जता परिपूर्ण
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीमारेषेवर भारतीय सैन्य चीनच्या सैन्याला तडफदार प्रत्युत्तर देतच राहील, असे आत्मविश्वासपूर्वक प्रतिपादन भारताचे भूसेनाप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी केले आहे. सीमेवर भारतीय सैन्याची सज्जता परिपूर्ण असून सीमारेषेचे संरक्षण करण्यात कोणतीही कुचराई होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत आणि चीन यांच्यात गेली पावणेदोन वर्षे लडाख सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. या सीमेवर अनेक स्थानी दोन्ही सेना एकमेकींच्या डोळय़ाला डोळा भिडवून उभ्या आहेत. भारतीय सेनेने चीनला यशस्वीरित्या रोखले आहे. तणाव निवळण्यासाठी चर्चाही एका बाजूला सुरु आहे. बुधवारी या चर्चेची 14 व्या फेरीचा प्रारंभ कमांडर पातळीवर झाला आहे. मात्र, भारतीय सेना कोणतीही ढिलाई न करता, सीमेचे संरक्षण करीत आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
तणाव कमी, पण धोका आहेच
लडाख सीमेवरील तणाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी चीनचा धोका मात्र तसूभरही कमी झालेला नाही. हॉट स्प्रिंग्ज (पॉईंट 15) भागात तणाव संपेल अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, संघर्षाची वेळ आलीच तर आम्ही पूर्णतः सज्जता केली आहे. आमची सज्जता अधिक प्रमाणात आहे. तणावाच्या भागातील दुहेरी उपयोगाच्या पायाभूत सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यांचे आधुनिकीकरणही सातत्याने पेले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
नागालँड प्रकरणाची चौकशी
4 डिसेंबरला नागालँड येथे भारतीय सैनिकांकडून काही निरपराध नागरीकांचा मृत्यू दहशतवादी समजून झाला होता. या प्रकरणाची सर्वंकष चौकशी केली जात असून कोणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. येत्या एक-दोन दिवसांमध्ये चौकशीचा अहवाल सादर केला जाईल. तो अभ्यासल्यानंतर कारवाईसंबंधी निर्णय घेण्यात येईल, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
चर्चेच्या फेऱया निष्फळ
आतापर्यंत भारत आणि चीन यांच्यात लडाख तणावासंबंधी चर्चेच्या 13 फेऱया झाल्या असून तोडग्यासंबंधी फारशी प्रगती झालेली नाही. देपसांग सपाट प्रदेशात चीनने भारतीय सैनिकांचे पारंपरिक पेट्रोलिंग पॉईंटस् रोखलेले आहेत. ते पीपी 10, पीपी 11, पीपी 11 अ आणि पीपी 13 या नावांनी ओळखले जातात. हा भाग काराकोरम मार्गानजीकच्या भारताच्या सामरिक महत्वाच्या दौलतबेग ओल्डीच्या जवळ आहे. देमचोक येथेही चीनने काही तंबू बसवले आहेत. ते काढण्यास चीन नकार देत आहे. त्यामुळे चर्चेत प्रगती होत नाही, असे तज्ञांचे मत आहे.
अमेरिकेचाही चीनला इशारा
अमेरिकेने मंगळवारी चीनला इशारा दिला असून, चीनच्या विस्तारवादाचा धोका त्याच्या शेजारच्या देशांना असल्याचे प्रतिपादन केले आहे. लडाख सीमेवरील तणावाकडे अमेरिकेचे बारकाईने लक्ष असून चीनने आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या मित्रदेशांच्या बाजूने राहू, कोणताही तणाव चर्चा आणि सामोपचाराने सोडविण्याला आमचा पाठिंबा राहील, असे अमेरिकेने स्पष्ट केले.









