ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनच्या तियानजिन भागात आईस्क्रीममध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. या आईस्क्रीममधूनच अनेकांना कोरोना झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, Tianjin Daqiaodao कंपनीचे आईस्क्रीम खाणाऱ्यांचा शोध आरोग्य प्रशासनाकडून घेतला जात आहे.
चीनमधील एका वृत्तवाहिनीनुसार, तियानजिन भागातील Tianjin Daqiaodao या स्थानिक आईस्क्रीम कंपनीच्या 4,836 बॉक्समध्ये कोरोनाचे विषाणू आढळले आहेत. 2,089 बॉक्सेस स्टोरेजमध्ये ठेवण्यात आले होते. 1812 बॉक्स परराज्यात पाठविण्यात आले होते. तर स्थानिक बाजारात 935 बॉक्सचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामधील 65 आईस्क्रीम विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
यूनिव्हर्सिटी ऑफ लीड्सचे व्हायरोलॉजिस्ट डॉ. स्टिफेन ग्रिफिन म्हणाले, मानवी संपर्कामुळे आईस्क्रिममध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाला असावा. कोल्ड टेंम्परेचरमुळे आईस्क्रीममध्ये कोरोनाचा विषाणू जिवंत राहिला. दरम्यान, कंपनीच्या 1662 कर्मचाऱ्यांना सेल्फ आयसोलेशनमध्ये जाण्याचे आदेश कंपनीने दिले असून, खबरदारी म्हणून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच आईस्क्रीम विक्रेते दुकानदार आणि संबंधित आईस्क्रीम पॅकेटच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे.









