प्रतिनिधी/ चिकोडी
राज्यात अद्याप कोरोना सक्रिय असताना राज्य सरकारने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. नियमांतही शिथिलता आणली आहे. शिक्षण खात्यानेही शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेण्यास मुभा दिली आहे. शाळा, महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रारंभी प्रथम शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात येत असून या तपासणी मोहिमेत चिकोडी शैक्षणिक जिह्यातील दोन माध्यमिक व दोन प्राथमिक शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सदर चारही शिक्षकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मध्यंतरी विद्यागम उपक्रम राबविताना कांही शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला व त्यात कांही शिक्षकांचा बळी गेल्याने शिक्षण खात्याने तात्पुरता हा उपक्रम बंद केला होता. आता पुन्हा विद्यागम उपक्रम 1 जानेवारीपासून सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सहावी ते नववी वर्गातील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत आहेत. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू करण्यात आले असून त्यांना मास्क व सॅनिटायझरचा वापर सक्तीने करावा लागत आहे.
पण सहावी ते नववी वर्गातील विद्यार्थी या विद्यागम योजनेअंतर्गत शाळेत दाखल होत असल्याने विद्यार्थी संसर्ग झालेल्या सवंगडय़ांच्या सहवासात येऊन त्यांना याची बाधा होण्याची शक्मयता आहे. या बालकांची कोणतीही कोरोना तपासणी करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. शिक्षण खात्याने प्रारंभीपासूनच विद्यागम उपक्रम सुरू करताना कोरोना संबंधित खोकला, सर्दी, डोकेदुखी अशी लक्षणे असलेल्या शिक्षकांना शाळेत येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले आहेत. तसेच अशी लक्षणे आढळून आलेल्या शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. आता शाळा महाविद्यालये सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकांची नजीकच असलेल्या सार्वजनिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना तपासणी करण्याचे काम सुरू आहे.
चिकोडी शैक्षणिक जिह्यात आतापर्यंत 15 हजार पैकी 11 हजार शिक्षकांची कोरोना तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित चार हजार शिक्षकांची तपासणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. या कोरोना तपासणीमध्ये हुक्केरी तालुक्मयातील सलामवाडी येथील माध्यमिक शाळेचे दोन शिक्षक तर रायबाग तालुक्मयातील मुगुळखोड येथील प्राथमिक शाळेतील दोन शिक्षक कोरोनाबाधीत आढळले आहेत. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी गजानन मन्नीकेरी यांनी दिली.









