66 ग्रामपंचायती, 1087 उमेदवार
सकाळी दहापासून मतमोजणी
भाजप की महाविकास आघाडी?
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिह्यातील 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी सोमवार 18 जानेवारीला होत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार असून पुढील दोन तासात निकाल अपेक्षित आहे. दरम्यान, मतमोजणीच्या ठिकाणी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीत भाजप की महाविकास आघाडी बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी जिह्यात 71 टक्के मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रकिया शांततेत पार पडली. 494 जागांसाठी एकूण 1087 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. आता निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात येतील, असा दावा केला आहे.
जिल्हय़ातील 431 ग्रामपंचायतींपैकी पाच वर्षांची मुदत संपलेल्या 70
ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होऊन निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. त्यापैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित 66 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान झाले. 70 पैकी 4 ग्रा. पं. बिनविरोध झाल्याने 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण 494 जागांसाठी 1087 उमेदवार रिगणात आहेत. त्यात 450 महिला उमेदवार आहेत. 270 मतदान केंद्रांवर 71 टक्के मतदान झाले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयात सोमवारी सकाळी दहा वाजल्या पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मतमोजणीची सर्व तयारी निवडणूक विभागाने पूर्ण केली असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.









