वृत्तसंस्था/ बेंगळूर
प्रो कबड्डी लीगमधील सामन्यात गुजरात जायंट्सने विद्यमान विजेत्या बंगाल वॉरियर्सचा 34-25 अशा गुणांनी पराभव केला तर दुसऱया सामन्यात बेंगळूर बुल्सने यूपी योद्धावर 31-26 अशी मात केली.
गुजरात जायंट्सच्या रायडर्सनी अप्रतिम कामगिरी करीत वॉरियर्सच्या बचावफळीला चुका करण्यास भाग पाडले. अजय कुमारने 9 गुण मिळविले तर परदीप नरवालने 7 गुण मिळवित त्याला चांगली साथ दिली. प्लेऑफमधील स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱया वॉरियर्सला या पराभवामुळे धक्का बसला आहे. त्यांचा कर्णधार मनिंदर सिंगने 9 गुण मिळविले. पण त्याला इतरांकडून पुरेशी साथ मिळाली नाही. शिवाय गुजरातच्या बचावफळीनेही त्यांना यश मिळू दिले नाही. गुजरातने मध्यंतराला 13-12 अशी निसटती आघाडी घेतली होती. उत्तरार्धात एकदा ऑलआऊट केल्यानंतर गुजरातने शेवटच्या पाच मिनिटांत 9 गुणांची आघाडी मिळविली होती. तीच कायम राखत त्यांनी विजय साकार केला.
सांघिक कामगिरीच्या जोरावर बेंगळूर बुल्सने यूपी योद्धाचा 31-26 असा पराभव केला. पवन सेहरावतने 9 रेडपॉईंट मिळविले तर अमनने 7 टॅकल गुण मिळविले. बेंगळूरने याआधी 6 पैकी फक्त एक सामना जिंकला होता. मध्यंतरास 5 मिनिटे असताना बेंगळूरने यूपीला ऑलआऊट पेले आणि मध्यंतरास 19-13 अशी आघाडी घेतली. उतरार्धात त्यांनी ही आघाडी वाढवत विजय साकार केला.









