मणिपूरच्या जिरिराम मतदारसंघात बदरुर रहमान यांना तिकीट
काँग्रेसकडून मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी आणखीन 10 उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पक्षाने सगोलाबंद मतदारसंघात एम. मोमो सिंह, यास्कूलमध्ये एन हेलेंद्रो सिंह आणि जिरिराम मतदारसंघात बदरुर रहमान यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी काँग्रेसने 22 जानेवारी रोजी 40 उमेदवार घोषित केले होते. यात माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह आणि प्रदेशाध्यक्ष एन. लोकेन सिंह यांची नावे सामील होती.
माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह हे थौबल मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. निवडणूक आयोगाने 8 जानेवारी रोजी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जाहीर केली होती.
या ईशान्येतील राज्यात 60 जागांसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी दोन टप्प्यांमध्ये ही निवडणूक होईल. पहिल्या टप्प्यात 38 जागांवर मतदान होईल. तर उर्वरित 22 मतदारसंघांमध्ये दुसऱया टप्प्यात मतदान पार पडणार आहे.









