रंगमंचावर एक अगदी नवोदित गायिका नाटय़गीत गात होती. आवाज छान, रियाज नियमित होत असावा. गाण्याची तयारी चांगली केलेली. आत्ताच्या कालोचित पद्धतीप्रमाणे अगदी बनठनके आलेली. गाणं संपलं. वन्समोअर पडला. म्हणजे गाणं खासच झालं. पब्लिकला आवडलं. नेमके त्या श्रोत्यांत एक ज्ये÷ गायक बसलेले होते. त्यांना कुणीतरी कौतुकाने विचारलं, ‘बघा कशी गाते आमच्या गावची ही मुलगी?’ आणि स्पष्टवक्तेपणा हे वैशिष्टय़ असणारे ते गायक पटकन उद्गारले. ‘गाते ते बाहेर बघून! काय उपयोग त्या तयारीचा? गाणं गाताना आधी आपण गाणं व्हावं लागतं.’ अर्थात त्या गायिकेला आणि तिच्या चाहत्यांना नक्कीच या शेऱयाचा राग आला असणार. काहीनी तर अनुचित बोलणंही केलं. तिने तर मैफिल संपल्यावर पाठीमागे बोलताना ‘यांचं वय झालंय म्हणून आत्ताची पिढी लहान वयात स्टेज गाजवतेय ते बघवत नाही यांना! नुसती खुसपटं काढतात.’ अशी त्यांची संभावना केली. पूर्ण मैफिल संपल्यावर खासगी वर्तुळात चाललेल्या या चर्चेला पूर्णविराम दिला तो तिच्या आईने. तिला त्या ज्ये÷ गृहस्थाने बोललेलंच योग्य वाटत होतं. तिनेही आपल्या मुलीला स्पष्टपणे बजावलं की गाताना तू आपण कशा दिसतो आहोत, लोकांना आपलं गाणं ऐकताना काय वाटतंय, आपला प्रभाव लोकांवर पडतोय की नाही, आणि आपण त्या अमुकतमुकला खाऊन टाकतोय की नाही याच गोष्टींवर लक्ष ठेवून होतीस. आणि हे मलाही जाणवलं. पण आईला कुणीच सीरियसली घेत नाही आणि तू तर नाहीच. म्हणूनच मी काही बोलणार नव्हते. आवाज तयार केला आणि घटवून, तयारी करून एकदा का गायला लागलात आणि कार्यक्रम मिळायला लागले की तुम्ही हवेत जाता. मग समोरच्या जगात जे कुणी असतील ते तुमच्या लेखी महामूर्ख असतात. असो. असं म्हणून ती पुढचं आवरायला निघून गेली आणि जमलेल्या सगळय़ा लोकांची पांगापांग झाली. हा प्रसंग आणि त्यावरची वेगवेगळय़ा लोकांची वेगवेगळी मतं हा विचार करण्यासारखाच विषय होता. त्यातून एकावर एक प्रश्न पडायला लागले. की ती तर सुंदर गायली होती. मग त्या ज्ये÷ कलाकाराला इतकं स्पष्ट बोलावंसं का वाटलं असेल? ते तिला ओळखत असतील का? असले किंवा नसले तरीही ते बोलणं तिने विचारात घेतलं असेल का? अशाच एका युवा कलाकाराचं गाणं ऐकून एका काहीशा अप्रसिद्ध परंतु श्रे÷ अशा कलाकाराने दिलेली प्रतिक्रिया ऐकायला मिळाली की ‘त्याने तोडीसारखा एक सखोल, गंभीर आणि वैचित्र्यपूर्ण राग गायला. मांडणी आकर्षक होती. टाळय़ा घेणारी होती. पण त्यात सखोल चिंतन आणि विचाराचा मात्र जवळपास पूर्ण अभावच होता.’ आता हे काही माझ्यासारख्या सर्वसामान्य श्रोत्याला कळतं असं नाही. पण साधारण एवढं कळतं की बाहेरून सगळं काही आहे पण आतून भावनांचं शिंपण नाही. किंवा कुंडीतल्या एखाद्या कृत्रिम झाडासारखी दिसणारी ही आकृती आहे. हिरवीगार टवटवीत पण निर्जीव! पण पुन्हा पुढचा प्रश्न पडतो की एखाद्या रागावर सखोल विचार करणं म्हणजे नक्की काय? गळय़ाने करायच्या रियाजासारखा मनानेही रियाज करायचा असतो का?
असं असेल तर मग अशा रियाजाला वैचारिक रियाज असं म्हणावं लागेल बहुधा. कृतीपेक्षा तिच्या मागचा हेतू जास्त महत्त्वाचा असतो. कलाकार जे गाणं सादर करणार असतात ते गाणं किंवा खरं तर कोणतंही गाणं गाणाऱयाला आणि ऐकणाऱयालाही काहीतरी सांगत असतं. त्याचं ते सांगणं आधी प्रेमाने ऐकून घ्यावं लागतं. त्याच्यात ज्या काही आनंदाच्या बिया दडलेल्या असतात त्या शोधून काढायच्या असतात आणि कोणतीही बी रुजून येण्यासाठी ओलावा आणि पुरेसा वेळ आवश्यक असतो, हे खरंच की! अनुभवी आणि पक्के रियाजी असणारे कलाकार असं म्हणतात की कितीही तयारी केली तरीही बऱयाचदा गाण्याचा प्रत्यक्ष मैफिलीतला आविष्कार हा उत्स्फूर्ततेकडेच जातो. पक्की आणि पूर्ण तयारी असेल तर आणि तरच त्या उत्स्फूर्ततेला योग्य वाट काढून देऊन श्रोत्यांसमोर आणणं शक्मय असतं. पण जर का मी चुका करणारच नाही आणि लोकांना माझ्या परफॉर्मन्स वर बोट ठेवू देणारच नाही याच हट्टाग्रहाने गात राहणाऱया कलाकारांचं सादरीकरण मोनोटोनस होत नसेल? म्हणजे अगदी जसंच्यातसं गाणं उचललं म्हणून टाळय़ा खूप पडल्या असतील पण सगळं आवरून रात्री भुईला पाठ टेकताना, आपल्याला आज गाण्याची खरीखुरी मजा किती प्रमाणात उपभोगता आली? आपल्याला ते गात असताना आतून भावना अनावर झाल्या होत्या की नाही? आपण गाणं काय म्हणतोय त्याऐवजी श्रोते काय म्हणतायत त्यावरच लक्ष ठेवून होतो का? हे प्रश्न त्याला पडतच नसतील का हो? पंडित कुमार गंधर्वांच्या एका मैफिलीला श्रोते खूपच कमी होते. त्यांना एका व्यक्तीनं हळूच विचारलं की आज ऐकणारे लोक खूप कमी आहेत तर पंडितजींचा आज मूड जमून येईल की नाही? त्यावर ते चटदिशी उद्गारले, ‘असू देत की कमी जास्त! आपण काय बाहेर बघून गायचं असतं काय?’ त्यावर पुलंचं एक सुंदर वाक्मय प्रतिक्रिया म्हणून आहे. ते म्हणजे ‘आतल्या सत्य शिव सुंदराला आळवीत गाणं!’ वस्तुतः ते किती मोठे कलाकार होते! आज मला गायचा मूड लागत नाही म्हणाले असते तरीही लोकांनी त्यांचं म्हणणं झेललं नसतं का? पण नाही. ते दिखाऊ गाणं नव्हतंच मुळी. स्वतःच्या मनाशी प्रामाणिकपणा जपणारा कुठलाही कलाकार बाह्य उपाधींनी विचलित होत नाही.
एखाद्याचं तासभर चाललेलं गायन ऐकूनही न हलणारं काळीज एखाद्या गायकाच्या नुसत्या सा लावण्याने पाघळायला लागतं ते काय उगीच? जो माणूस स्वप्रतिमेहून जास्त प्रेम अर्थातच गाण्यावर करतो तो गाण्याला सतत आर्जवीत गातो. साहजिकच त्याचं गाणं हे रसपूर्ण असतंच. श्रोत्यांना खिळवून ठेवण्यासाठी त्याला मुद्दाम सर्कस करायची गरजच पडत नाही. आजच्या काळाचा महिमा म्हणून स्वतःला लॉन्च करण्यात रमलेल्या कलाकारांचं लक्ष गाण्यापेक्षा प्रमोशनवरच जास्त रहातं आणि मग आपण कोणतंही गाणं आवड म्हणण्यापेक्षा आव्हान म्हणूनच स्वीकारलं जातं. मग इतरांपेक्षा मीच कसा/कशी भारी, मला येतं ते बाकीच्यांना आणि माझ्यापेक्षा जास्त शिकलेल्यांनाही कसं येत नाही, मी गाताना दिसतो कसा, मला रेकॉर्डिंगपासून ते एडिटिंगपर्यंत सग्गळं सग्गळं कसं कळतं! जगात एक मीच शहाणा आणि आसपासचे मूर्ख कसे किंवा बाकीच्यांच्या चुका कशा होतात हेच दाखवण्यात उमेदीचे दिवस खर्ची पडतात. आणि जेव्हा जगदुनिया अंगावर येते तेव्हा कळतं की आपण किती नगण्य जीव आहोत आणि जग किती मोठं आहे. जन्म राजहंसाचा आणि उद्योग मात्र कावळय़ाचे असं होतं. यावरून एक किस्सा आठवला. एक कवी गाणं असं म्हणत होता की,
गाणे माझे कोणाचे?
गाणे गाणे गाणाऱयाचे
गाणे होते कोणाचे?
गाणे होऊन जाणाऱयाचे!
याचा अर्थ एवढाच घ्यायचा की गाणं त्यालाच खऱया अर्थानं वश होतं जो स्वतःच गाणं होऊन जाईल.
– अपर्णा परांजपे-प्रभू








