राष्ट्रपतींच्या हस्ते अन्य अनेक शूरांना पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चीनबरोबर 15 जून 2020 च्या रात्री लडाखच्या गलवान सीमेवर झालेल्या भीषण संघर्षात वीरमरण पत्करलेले कर्नल संतोष बाबू यांना मरणोपरांत महावीर चक्र देऊन गौरविण्यात आले आहे. हा भारताच्या शौर्य पुरस्कारांमधील दुसऱया क्रमांकाचा मानाचा पुरस्कार आहे. गलवान येथील संघर्षात भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. मात्र, त्यांनी चीनच्याही 40 हून अधिक सैनिकांना यमसदनी पाठविले होते. हा रक्तरंजित संघर्ष बंदुकांच्या गोळय़ांनी न होता. काटेरी दांडुक्यांनी झाला होता. यात भारतीय सैनिकांचे नेतृत्व संतोष बाबू यांच्याकडे होते.
गलवान सीमेचे संरक्षण करीत असताना संतोष बाबू आणि त्यांच्या तुकडीतील सैनिकांवर चीनच्या सैनिकांनी हल्ला केला होता. त्यावेळी बाबू यांनी पराक्रमाची शर्थ करीत सीमेचे संरक्षण केले. चीनला त्याच्याच भाषेत त्यांनी आणि त्यांच्या तुकडीतील सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले. चीनचे अनेक सैनिक या संघर्षात मारले गेले. भारताच्याही 20 सैनिकांना प्राण अर्पण करावे लागले. चीनने त्यानंतर अनेक दिवस आपले सैनिक मारले गेल्याची कबुली दिली नव्हती. तथापि, त्याचे 40 हून अधिक सैनिक मारले गेल्याचे वृत्त अनेक विदेशी वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केले. नंतर चीनलाही आपले सैनिक मारले गेल्याचे मान्य करावे लागले. मात्र, चीनने मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या बरीच कमी सांगितली होती.
चार सैनिकांनाही वीरचक्र
याच संघर्षात हुतात्मा झालेले नायब सुभेदार नुदुराम सोरेन, हविलदार के. पलानी, नाईक दीपक सिंग आणि शिपायी गुरुतेज सिंग यांनाही मरणोपरांत वीरचक्र देऊन गौरविण्यात आले आहे. दीपक सिंग यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी अनेक सैनिकांचे प्राण वाचविले होते. या सर्व सैनिकांना प्रशस्तीपत्रही देण्यात आले.









