ठिकठिकाणी भव्य स्वागत : खानापूर तालुक्याच्या विकासासाठी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर करा : आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची शासनाकडे मागणी

प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यातील विविध समस्यांचे निवारण करावे, या मागणीसाठी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या खानापूर ते सुवर्णसौध 40 या कि. मी. पदयात्रेला रविवारी दुपारी 3 वाजता राजा शिवछत्रपती चौकातून सुरुवात झाली. पदयात्रा सुरू करण्यापूर्वी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी शिवस्मारकाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

संघर्ष पदयात्रेत सहभागी झालेल्या जनतेशी संवाद साधताना आमदार डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, गेल्या साडेतीन वर्षात खानापूर तालुक्यातील विविध समस्यांचे निवारण व्हावे, यासाठी राज्य शासनाकडे विविध मार्गानी मागणी करण्यात आली. तसेच वेळोवेळी विधानसभेत आवाजही उठवला. पण राज्य शासनाने खानापूर तालुक्याच्या समस्या निवारणाकडे गांभीर्याने लक्ष घातले नाही. यामुळे तालुक्यातील जनतेला बऱयाच अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण अगदी अल्प मदत जाहीर करून राज्य शासनाने शेतकऱयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे निद्रीस्त झालेल्या राज्य शासनाला जागे करण्यासाठी संघर्ष पदयात्रेचा मार्ग अवलंबावा लागत आहे. राज्य शासनाने तालुक्यातील विकासाला चालना देण्यासाठी 1 हजार कोटी रु. चे पॅकेज जाहीर करावे, अशी आपण मागणी करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

यानंतर पदयात्रेला सुरुवात होत असतानाच खानापूरच्या उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकाच्या शिष्टमंडळाने आरती ओवाळून डॉ. अंजली निंबाळकर यांच्या संघर्ष पदयात्रेला शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी जांबोटीचे कलगुंटकर महाराज तसेच शिवयोगी स्वामीजी हिरेमुन्नोळी तसेच मास्केनहट्टी येथील स्वामींच्या हस्ते पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या पदयात्रेच्या अग्रभागी भजनी मंडळ, धनगरी वाद्य तसेच पाठोपाठ संघर्ष पदयात्रेतील कार्यकर्त्यांचा जथ्था होता. या संघर्ष पदयात्रेत काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, महिला, विद्यार्थी, युवक, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत. पदयात्रेच्या मार्गात आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत बसवेश्वर महाराज, महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळय़ांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच चौराशी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतल्यावर संघर्ष पदयात्रा पारिश्वाड रोड, बरगांव, निडगल, सन्नहोसूर मार्गे, गर्लगुंजीकडे मार्गस्थ झाली.

हा राजकीय स्टंट नव्हे : आमदार निंबाळकर
यावेळी पत्रकारांनी तुमची पदयात्रा म्हणजे राजकीय स्टंट असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. याबद्दल तुमचे मत काय, असा सवाल केला असता, त्या म्हणाल्या, राजकीय स्टंट करायला आता कुठल्या निवडणुका नाहीत. जर राजकीय स्टंट असते तर एवढय़ा मोठय़ा संख्येने लोक सहभागी झाले नसते. जे लोक या संघर्ष यात्रेची राजकीय स्टंटबाजी म्हणून प्रचार करीत आहेत त्यांनी पहिल्यांदा येऊन खानापूर तालुक्यातील अडीअडचणी प्रत्यक्ष पहाव्यात, आणि मगच असे आरोप करावेत, असे उत्तर दिले. विधानसभेत यासंदर्भात आवाज उठवणार का, असाही सवाल पत्रकारांनी केला. त्यावर डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, यापूर्वीच तालुक्याच्या समस्यांची प्रश्नावली देण्यात आली आहे. त्यामध्ये विधानसभेत संधी मिळाली तर निश्चितपणे आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पदयात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. अनेकांनी आपल्या शुभेच्छाही व्यक्त केल्या. पदयात्रेचा रविवारी रात्री येळळूर येथे मुक्काम झाला.

संघर्ष पदयात्रेचा आजचा कार्यक्रम
सोमवार दि. 13 रोजी पहाटे 5.30 वाजता पुन्हा येळळूरमधून संघर्ष पदयात्रेला सुरुवात होणार आहे. ही पदयात्रा वडगाव येडियुराप्पा मार्गावरून सकाळी 8.30 वाजता महामार्गावर पोहोचणार आहे. त्यावेळी पदयात्रेत विधीमंडळातील विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक काँग्रेस प्रदेशचे कार्याध्यक्ष आमदार सतिश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर तसेच नेतेमंडळीही सहभागी होणार असून सकाळी 9.30 वाजता संघर्ष पदयात्रा सुवर्णसौधसमोर पोहोचणार आहे.
पदयात्रा रद्दसाठी प्रशासनाचा दबाव
आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी जाहीर केलेल्या संघर्ष पदयात्रेमुळे प्रशासनाची झोप उडली आहे. ही संघर्ष पदयात्रा रद्द करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यावर बराच दबाव आणला. पण त्या दबावाला न जुमानता ठरल्याप्रमाणे संघर्ष पदयात्रा काढणारच, तुम्ही माझ्यावर पाहिजे ती कारवाई करा, मी त्याला झुकणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला व ठरल्याप्रमाणे संघर्ष पदयात्रा सुरू केली.
येळळूर येथे मुक्काम
संघर्ष पदयात्रा येळळूर येथे वास्तव्यास राहिली असल्याने त्या ठिकाणी येळळूरवासियांकडून शाळेत राहण्या जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीसुद्धा आपल्यासाठी कोणतीही सोय न स्वीकारता सर्व कार्यकर्त्यांसमवेत वास्तव्य केले. त्यांच्या संघर्ष पदयात्रेला येळळूर भागातील जनतेनेही शुभेच्छा दिल्या.
चलो सुवर्णसौध : खानापूरच्या विकासासाठी संघर्ष पदयात्रा आज सुवर्णसौधवर धडकणार
आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा पुढाकार : संघर्ष पदयात्रेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद, हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग
राज्य सरकारचे खानापूर तालुक्मयातील प्रलंबित ज्वलंत आणि गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी खानापूर ते सुवर्णसौध अशी 40 किलो मीटरची ‘खानापूर संघर्ष पदयात्रा’ रविवारी दुपारी खानापुरातून काढण्यात आली. खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूरच्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी राज्य शासनावर दबाव आणण्याचा हा त्यांचा एक प्रयत्न असून खानापूरच्या इतिहासात विकासासाठी काढण्यात आलेली ही पहिलीच संघर्ष पदयात्रा म्हणावी लागेल.
खानापूर तालुका विकासापासून वंचित आहे. शासकीय सुविधा तसेच आवश्यक निधीची पूर्तता करण्यात राज्यातील भ्रष्ट भाजप सरकार कमकुवत ठरले आहे. अनेकवेळा मागण्या करूनही गेल्या साडेतीन वर्षात अपेक्षित निधी, शैक्षणिक सुविधा, बस आगाराचा प्रश्न, बहुग्राम पाणी योजना अशा अनेक योजना मंजूर करण्यास राज्य प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. खानापूर तालुक्मयाचा सर्वांगीण विकास व्हावा हा हेतू घेऊन तालुक्मयातील तमाम जनतेने विश्वासाने निवडून दिले आहे. पण राज्य सरकारकडून पाठपुरावा केलेल्या विकासकामांचा निधी मंजूर करण्यास भाजप सरकार राजकारण करत आहे. यासाठी रविवारी खानापुरातून या भव्य अशा संघर्ष पदयात्रेला हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला असून या संघर्ष पदयात्रेचा धडक मोर्चा सोमवारी सुवर्णसौधवर धडकणार आहे.
आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा या संघर्ष पदयात्रेचा हेतू असा आहे की, खानापूर तालुक्मयातील अनेक रस्त्यांसाठी निधी मंजूर करून आणला आहे. पण वनविभागाकडून नियमांचे कारण सांगून आडकाठी करण्याचे काम सुरू आहे. दुर्गम भागातील रस्त्यांचा विकास करत असताना एकाही झाडावर कुऱहाड उगारली जाणार नाही, हे पटवून देऊन देखील विकासकामे करू दिली जात नाहीत. त्यामुळे पश्चिम भागातील विकास तसेच येथील जनतेने आणखी किती दिवस हालाखीचे जीवन जगावे ते एकदा राज्य सरकारने स्पष्ट करावे, असा खोचक सल्ला दिला.
अतिवृष्टीमुळे 67 वर्गखोल्या पूर्णपणे कोसळल्या आहेत, तर 255 खोल्यांचे नुकसान झाले आहे. सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. कायमस्वरूपी शिक्षकांची भरती केली जात नाही. याचा परिणाम गुणात्मक शिक्षणावर होत आहे. शिक्षण, आरोग्य आणि रस्ते या मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारला विविधप्रकारे जाग आणण्याचा प्रयत्न केला. पण सरकारला कोणतीच भाषा कळत नाही. अशा निद्रीस्त सरकारला जाग आणण्यासाठी जनतेच्या सहकार्याने ही अनोखी पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.
महापुरामुळे नुकसान झालेल्या घरांची कामे अर्धवट आहेत. एक दोन हप्ते देऊन उर्वरित रक्कम देण्यास सरकारकडून टाळाटाळ केली जात असल्याने हक्काचे छत गमावलेले अनेक जण बेघर झाले आहेत. हायटेक बसस्थानकासाठी 8 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असताना अचानक थांबविली जाते.
हेस्कॉममध्ये कर्मचाऱयांची कमतरता आहे. एका लाईनमनला 20 ते 25 गावांचा डोलारा सांभाळावा लागतो. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठय़ाचे तीन-तेरा वाजत आहेत. सरकारी काम हे ईश्वराची सेवा समजली जाते. त्यामुळे जनतेच्या विकासाचा विचार केला जाणाऱया सुवर्णसौधलाच धडक देऊन खानापूर तालुक्मयातील जनतेच्या व्यथा वेगळय़ा पद्धतीने अधिवेशनाच्या पटलावर मांडल्या जाणार आहेत.
विरोधी पक्षाची आमदार म्हणून सापत्न वागणूक
विरोधी पक्षातील आमदार असल्याने राज्य सरकार जाणीवपूर्वक खानापूर तालुक्मयाकडे दुर्लक्ष करत आहे. तालुक्मयातील महत्त्वाचे राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते आणि ग्रामीण संपर्क रस्त्यांचे अनेक प्रस्ताव राज्य सरकारकडे धूळखात पडून असून जाणीवपूर्वक खानापूरकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. खानापूर तालुका म्हणजे उपेक्षित आणि दुर्लक्षित ही राज्य सरकारची मानसिकताच झाली आहे. या पदयात्रा आणि मोर्चाच्या माध्यमातून या राज्य सरकारच्या मानसिकतेवर जोरदार प्रहार करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
खानापुरातून रविवारी दुपारी प्रारंभ झालेल्या या संघर्ष पदयात्रेत हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. भाजप सरकारचा निषेध नोंदवत या मोर्चामध्ये तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्तेही सहभागी झाले होते. खानापुरातून सुरुवात झालेल्या या यात्रेचा मुक्काम येळळूर येथे झाला. खानापूर, बरंगाव, निडगल, सन्नहोसूर, गर्लगुंजी, राजहंसगड सुळगेमार्गे झालेल्या या पदयात्रेत प्रत्येक गावामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. येळ्ळूर येथे रात्री मुक्काम झाल्यानंतर सोमवारी पहाटे बेळगावातून जाऊन सुवर्णसौधला हा मोर्चा धडकणार आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह जिल्हय़ातील आमदार, माजी आमदार सहभागी होणार आहेत.
तालुक्याच्या समस्यांसाठी माजी मुख्यमंत्र्यांचा मोर्चात सहभाग
खानापूर तालुक्मयाच्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱया आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी काढलेल्या संघर्ष पदयात्रेत राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यासह जिह्यातील अनेक आमदार, माजी आमदारांनी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यपातळीवर या मोर्चात वरि÷ नेत्यांनी सहभाग घेतला आहे. पहिल्यांदाच तालुका पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी त्यांची या मोर्चातील उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.
पदयात्रेत हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली
रविवारी दुपारनंतर बेळगाव सुवर्णसौधच्या दिशेने चाललेल्या संघर्ष पदयात्रेत हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांना ‘कँडल मार्च’द्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारास गर्लगुंजी ते राजहंसगड दरम्यान सीडीएस बिपिन रावत व तसेच इतर वरि÷ लष्कर प्रमुख व त्यांच्या कुटुंबीयांना ‘कॅण्डल मार्च’द्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.









