64 लाखांचे सोन्या चांदिचे दागिने घेऊन पसार,लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी / कोल्हापूर
सोन्या चांदीच्या दागिन्यांची विक्री करुन देण्याच्या बहाण्याने सराफ व्यावसायिकांची फसवणूक करणाऱया हुपरी येथील श्रीकांत ऊर्फ अमित तवनाप्पा कांते (वय 37, रा. हुपरी, ता. हातकणंगले) याच्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. लक्षतीर्थ वसाहत येथील दोघा व्यापाऱयांना 64 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले. याबाबतची फिर्याद दत्तात्रय दिनकर म्हसवेकर यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, म्हसवेकर हे यशोदा विश्वास कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत येथे राहतात. त्यांचा सोने-चांदीचे दागिने मजुरीवर करून देण्याचा व्यवसाय आहे. त्याचबरोबर या भागातील सुभाष शिंदे हे चांदी व्यवसायिक आहेत. ते चांदीच्या मूर्ती तयार करतात. कांते याने या दोघांच्या संपर्कात येऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 12 मार्च ते 12 ऑगस्ट 2020 दरम्यान म्हसवेकर यांच्याकडून विक्रीसाठी म्हणून 42 लाख 45 हजार 39 रुपये सुमारे एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने घेतले. त्याचबरोबर सुभाष शिंदे यांच्याकडून त्याने 21 लाख 41 हजार 820 रुपये किमंतीचे 35 किलो 697 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मूर्ती, मुकूट असा ऐवज विक्रीसाठी घेतला. पण, त्याबदल्यात त्याने रोख स्वरूपात रक्कम दिली नाही की घेतलेले दागिने, चांदीचा ऐवज परत दिला नाही. त्याने आपली फसवणूक केली असल्याची फिर्याद म्हसवेकर यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार संशयित श्रीकांत ऊर्फ अमित कांतेवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तपास पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली वाडकर करीत आहेत.
श्रीकांत उर्फ अमित कांते याचेवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात 47 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने कोल्हापूर, हुपरी, इचलकरंजी, बेळगाव येथील व्यापाऱयांना गंडा घातला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.









